गंगापूर, (प्रतिनिधी) : सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती, गंगापूर यांच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण भागवत कथेचा पहिल्या दिवसाचा शुभारंभभक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. ह.भ.प. सुश्री पलक किशोरीजी यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीकृष्णाच्या दिव्य लीला, भक्तीचा महिमा आणि आध्यात्मिक विचारांचे निरूपण करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविक भक्तिरसात तल्लीन झाले.
गंगापूर शहरातील जिल्हा परिषद मैदानावर सार्वजनिक दुर्गामाता नवरात्रोत्सव समितीच्या वतीने सलग दहाव्या वर्षी भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष संजय जाधव आणि समितीच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा संजय जाधव यांच्या पुढाकारातून धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी उत्सवाला विशेष स्वरूप प्राप्त झाले आहे.
पलक किशोरीजी यांनी आपल्या रसाळ वाणीतून श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या लीलांचे महत्त्व विशद केले. भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा संदेश देणाऱ्या या कथेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
श्रीकृष्णाच्या नामघोषाने वातावरण भारावून गेले असून, भाविकांनी कथाश्रवणाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाची संकल्पना संजयजी जाधव यांची असून, सुवर्णाताई जाधव या कार्यक्रमाच्या आयोजिका आहेत. त्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी गंगापूरचे उपनगराध्यक्ष अमोल जगताप, नगरसेवक तथा गटनेते संतोष अंबिलवादे, सोपान देशमुख, नवनाथ कानडे, योगेश पाटील, विशाल गायकवाड, भाविकांचा उत्स्फूर्त मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. यामुळे श्रीकृष्ण भागवत कथेच्या पहिल्या दिवसाला विशेष रंगत आली. या धार्मिक उपक्रमातून भाविकांना आध्यात्मिक विचारांचे श्रवण करण्याची आणि भक्तीभाव अनुभवण्याची संधी मिळत आहे.














