लंडन : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज जय महाराष्ट्रचा निनाद घुमला. एकनाथ शिंदेंना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाचे गौरविण्यात आले. या ऐतिहासिक सभागृहात मराठी भाषेचा एकच गजर झाला. विशेष म्हणजे यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार- जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून करून एकनाथ शिंदे यांनी भाषेचा अभिमान तर व्यक्त केलाच, पण महाराष्ट्राच्या विकासाची कहाणीही मांडली. आई -पत्नीच्या काबाडकष्टांतून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली असे एकनाथ शिदेंनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याला मोठी संधी असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. एकनाथ शिंदेंनी नमस्कार.. जय हिंद- जय महाराष्ट्र म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच, जय भवानी जय शिवाजी आणि भारत माता की जय.. अशी घोषणाबाजी करत भाषणाला सुरुवात केली. रिस्पेक्टेड बेरोनेस... म्हणत एकनाथ शिंदेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच ब्रिटनच्या संसदेत मला भाषण करण्याची संधी मिळतेय हा माझ्यासाठी बहुमान असल्याचे म्हटले. तसेच, आपल्या भाषणात त्यांनी, महाराष्ट्र सरकाने जनहितासाठी केलेल्या कामाची माहिती देत, महिला सक्षमीकरणावर भर दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गेमचेंजर योजना ठरल्याची माहिती त्यांनी दिली. एकनाथ शिदेंना देण्यात आलेल्या पुरस्काराबात त्यांनी आभार मानले, तसेच, महाराष्टाच्या 12 कोटी लोकांचा हा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात सुरेश भटांच्या कवितेचा उल्लेख केला, लाभले आम्हास भाग्य जाणतो मराठी... ही कविता म्हणून दाखवत मातृभाषण मराठी आणि महाराष्ट्राची ओळख ब्रिटनच्या संसदेला करुन दिली. तसेच, मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विविध योजनांचा उल्लेख आणि जनहितासाठी या योजनांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अंमलबजावणीची माहिती दिली. इट इज अ पिपल सेंट्रीक अप्रोच ऑफ टू द पब्लिक सर्व्हीस... म्हणत एकनाथ शिदेंनी फाडफाड इंग्रजीतून केलेल्या आपल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील गेमचेंजर 'लाडकी बहीण योजना' ही काही चॅरिटी नाही तर महिलांच्या सबलीकरणाची योजना बनली. जागतिक स्तरावरील संस्थांकडून लाडकी बहीण योजनेची दखल झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले. त्यासह, शासन आपल्या दारी योजनेमुळेही लाखो लोकांचा फायदा झाला,केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही, तर विकास लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे असते, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विसकित भारत 2047 च्या ध्येयाचा उल्लेख करत महाराष्ट्राने विकासाची गती पडकली आहे. मुंबई आणि लंडन हे जगातील दोन मोठे आर्थिक केंद्र असल्याचंही त्यांनी म्हटलं.
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि 'कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस' यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे हा पार पडलेल्या या सोहळ्यात उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे त्याचप्रमाणे संसदेच्या सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा बहुमान त्यांना देण्यात आला विशेषत: त्यांच्या काळातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना', नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचवणारा 'शासन आपल्या दारी' उपक्रम या प्रमुख योजना राबविण्यासाठी त्यांना गौरविण्यात येत असल्याचे त्यांच्या मानपत्रात म्हटले आहे.