कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली आणि एक वादंग निर्माण झाले. आता राज्यातील राजकारणाला एक वेगळेच वळण लागले आहे. शिवसेना आणि कंगनामध्ये चांगलाच वाद सुरू आहे. दरम्यान आता या वादावर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही कंगनाला सुनावले आहे. बुधवारी कंगना मुंबईत आली यापूर्वीच बीएमसीकडून तिच्या कार्यालयाची अनधिकृत असल्याचे सांगत तोडफोड करण्यात आली. यानंतर कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. या टीकेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. यावरुन आता शिवसेनेशी कधीही न पटणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही कंगनाला चांगलेच सुनावले आहे. इम्तियाज जलील यांनी याविषयावर एक ट्विट केले. ते म्हणाले की, ’आमचे शिवसेनेसोबत राजकीय मतभेद असू शकतात. पण उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. यामुळे त्यांचा अनादर केलेला सहन करणार नाही. कंगनाने तिच्या भाषेचा आणि वक्तव्याचा विचार करायला हवा,’ असे ते म्हणाले.