मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांचे संबंध कमालीचे बिघडले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या बिहारमधील नवनियुक्त सरकारच्या शपथविधीवेळी दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना टाळण्याच्या झालेल्या प्रयत्नांमुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारचा शपथविधी नुकताच पार पडला. या शपथविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित होते. मात्र या शपथविधीदरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरून हे दोन्ही नेते एकमेकांवर नाराज असल्याचे दिसून येत होते. या शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या विमानांमधूना पाटणा येथे गेले. तसेच शपथविधीवेळीही ते लांब लांब बसल्याचे दिसून आले. तर येथून येतानाही दोन्ही नेते वेगवेगळ्या विमानांमधून आले. एवढंच नाही तर आज हुतात्मा स्मारकाजवळील कार्यक्रमावेळी समोरासमोर आल्यावर शिंदे आणि फडणवीस यांनी केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना अभिवादन केले आणि दोघेही बाजूला झाल्याचे दिसले. एवढंच नाही तर या कार्यक्रमानंतर महायुतीमधील नाराजीबाबत विचारले असता एकनाथ शिंदे यांनी त्या प्रश्नाला बगल देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस हे एकाच विमानाने बिहारला गेले. तसेच तिथेही एकत्रच दिसले. या घटनाक्रमामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध खूपच बिघडले असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकल्यानंतर शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठत थेट अमित शाहांकडे तक्रारीचा पाढा वाचला. यात प्रामुख्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर रोष व्यक्त केला. रवींद्र चव्हाण वैयक्तिक स्वार्थासाठी महायुतीतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप केला. मात्र शिंदेसेनेतील मंत्री उदय सामंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं भरभरून कौतुक केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
एकनाथ शिंदेंनी मांडली होती तक्रार
भाजपाचे नेते आमचा पक्ष संपवत असल्याने शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. जवळपास 50 मिनिटे या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत शिंदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची तक्रार केली. सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात शिंदेसेनेच्या अनेक माजी पदाधिकारी, नगरसेवकांना गळाला लावण्याचं काम रवींद्र चव्हाण यांच्याकडून केले जात आहे. आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोडून भाजपात प्रवेश दिला जात आहे. हे राजकारण आगामी निवडणुकीत महायुतीला अडचणीत आणू शकते. त्यातून वातावरण दूषित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. काही नेते त्यांच्या स्वार्थासाठी हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे विरोधकांना त्याचा अनावश्यक फायदा मिळत आहे असं सांगत शिंदेंनी रवींद्र चव्हाण यांच्याविषयी शाहांकडे तक्रार दिली होती.
दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने रवींद्र चव्हाण यांची पाठराखण केली. आरोप-प्रत्यारोप होतच राहतील तुम्ही पक्ष बांधणीचे काम सुरूच ठेवा, अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात भाजपाची विजयी घोडदौड चांगल्या पद्धतीने ठेवा असं केंद्रीय नेतृत्वाने भाजपा नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे शिंदेंनी तक्रार केल्यानंतरही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना बळ देण्याचं काम केल्याचं दिसून येते.