छत्रपती संभाजीनगर, (सांज वार्ता ब्युरो) : शहरात नव्याने तयार करण्यात आलेले तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प व नारेगाव येथील जुन्या डेपोत पडून असलेला कचरा डोकेदुखी ठरत असून महापालिकेने आत्तापर्यंत ६३ कोटी रुपये खर्च करून सुमारे १० लाख मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया केली आहे. शासनाने दिलेला निधी काम पूर्ण न होताच संपला. त्यामुळे आता नव्याने डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात आला असून, तो ५८ कोटी रुपयांचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कचरा प्रक्रियेचा खर्च तब्बल १२१ कोटींवर जाणार आहे.
महानगरपालिकेने अनेक वर्षे नारेगाव येथील कचरा डेपोत प्रक्रिया न करता कचरा साठवून ठेवला. त्यामुळे याठिकाणी कचर्याचे अक्षरशः डोंगर तयार झाले होते. कचर्यामुळे परिसरातील नागरिकांना जगणे अवघड झाले होते. अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर सात ते आठ वर्षांपूर्वी येथील कचराडेपो बंद करण्यात आला. मात्र, कचर्यावर प्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यासोबतच कचराकोंडीच्या काळात नव्या प्रक्रिया केंद्रावर ढीग तयार झाले. या संपूर्ण कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने प्रकल्प सल्लागार संस्थेची (पीएमसी) नियुक्ती केली. त्यानुसार सुमारे १२ लाख मेट्रिक टन कचरा नारेगाव कचरा डेपोवर पडून असल्याचे स्पष्ट करत त्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यासाठी ६९ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.
राज्य शासनाने डीपीआरला मंजुरी देत ६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. नारेगाव येथील कचरा डेपोची संपूर्ण जागा मोकळी होणे अपेक्षित होते. सुरुवातीला निविदाधारकाने प्रक्रिया न करताच कचरा खदानीत फेकण्याचा प्रताप केला. त्याानंतर कंत्राटदावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, प्रकल्पावर सीसीटीव्ही लावून प्रत्येक टनाचा हिशेब ठेवण्यात आला. पण नारेगाव कचराडेपो आत्तापर्यंत स्वच्छ झालेला नाही. दरम्यान, १० लाख मेट्रिक टन कचर्यावर आतापर्यंत प्रक्रिया झाल्याचे तोंडी सांगितले जात आहे. आता नव्याने डीपीआर तयार करण्यात आला असून, तब्बल ५८ कोटीच्या निधीची गरज असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कचरा प्रक्रियेवर पाण्यासारखा पैसा खर्च होत असून, पहिला डीपीआर तयार करताना कचरा नेमका किती? हे प्रशासनाच्या लक्षात आले नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.











