कोट्यावधी रुपये खर्च करूनही पैठणमधील नागरिकांच्या घरात घुसले पाणी

Foto

कोट्यावधी रुपये खर्च करूनही पैठणमधील नागरिकांच्या घरात घुसले पाणी

पैठण (प्रतिनिधी) : मागील शनिवारी तसेच रविवारी २१ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे राहुल नगर भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी घुसून संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्य वाहून गेले आहे. १३ सप्टेंबर रोजी राहुल नगर, पैठण शहरातील आणि भागात पावसाचे पाणी घुसून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याची घटना ताजी असतानाच व त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. पुन्हा २१ सप्टेंबर रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राहुलनगर, पैठण शहरातील संतनगर, नारळा भागातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राहुल नगर भागात विविध कामासाठी शासनाचा विविध फंडातून कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च झाला आहे. हे काम दर्जाहीन झाली असल्याने या भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या ठिकाणी करण्यात आलेल्या नाल्या अत्यंत अरुंद व दर्जाहीन करण्यात आलेल्या आहेत.

नाथसागर जलाशयात आवक वाढली :

शनिवारी, रविवारी रात्री अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नाथ सागर जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. नाथसागर जलाशयाचे १८ दरवाजे चार फूट उंच उचलून ७५४५४ हजार क्यूसेक पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. नाथसागर जलाशयाचे पाणी पातळी ९९.४५ टक्के झाली आहे.