परळी- शेतकरी दुष्काळामुळे मरण यातना भोगतो आहे, पाण्याअभावी त्याचा ऊस वाळत आहे, अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याऐवजी ऊसाचे गाळपात राजकारण कसले करता? खबरदार यापुढे ऊसाचे राजकारण कराल तर गाठ सभासद शेतकर्यांशी आहे, असा सज्जड इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी(ता.१८) वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला दिला. यापुढे परिस्थिती न सुधारल्यास कारखान्यासमोरच सभासद शेतकरी आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला. त्या आधी त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले.
तालुक्यातील शेतकरी वैद्यनाथ कारखान्याच्या
ऊसाच्या राजकारणामुळे त्रस्थ झालेले आहेत, सभासद असतानाही केवळ मनमानी पोटी आणि राजकीय
द्वेषभाव ठेऊन ऊसाचे गाळप केले जात असल्याने सभासद शेतकर्यांमधेय तिव्र असंतोष
पसरला असून, तो आज कारखान्याच्या प्रशासनाला दिसून आला. ना.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज.
रा. कॉ. च्या पदाधिकार्यांनी असंख्य सभासद आणि शेतकर्यांसह कारखान्याला धडक
दिली. कार्यकारी संचालकांना कल्पना देऊनही ते न थांबल्याने अर्धा तास कार्यालयातच
सर्वांनी ठाण मांडले. अखेर व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव, संचालक ज्ञानोबा
मुंडे यांना शिष्टमंडळाला सामोरे जावे लागले. स्व.मुंडे साहेबांनी आणि
स्व.पंडितअण्णा मुंडे यांनी स्वतःच्या रक्ताचे पाणी करून हा कारखाना उभा केला, मोठा केला तो
तुम्ही राजकारणापायी नष्ट करू नका असा इशारा मुंडे यांनी दिला. स्व.मुंडे साहेब व
स्व.अण्णांनी कधीही ऊसाचे राजकारण केले नाही, विरोधकांच्या ऊस गाळपातही कधी भेदभाव केला
नाही. तुम्ही स्वतःच्या सभासदाच्या ऊसाचे राजकारण कसले करता. दुष्काळात होरपळणारा
शेतकरी तुमच्या धोरणामुळे मरण यातना भोगत आहे, परिस्थिती सुधारून हे राजकारण बंद न केल्यास
तिव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला. ऊसाचे राजकारण कसे होत आहे, याचे उदाहरण
देताना कारखान्याच्या चेअरमनचाच ऊस गाळप कार्यक्रम तोडुन आणल्याचा दाखला त्यांनी
दिला.
















