धनंजय मुंडेेंना दिलासा; औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Foto

बीड :  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार आदेश दिल्याच्या चौथ्या दिवशी आज सकाळी ७ वाजता धनजंय मुंडे यांच्यासह १४ जणांवर अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध बर्दापूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

जगमित्र साखर कारखान्यासाठी बेकायदेशीरपणे इनामी जमीन खरेदी केल्याचे हे प्रकरण आहे. राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीनुसार २०११ मध्ये जगमित्र शुगर मिल्स प्रा.लि.साठी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पूस येथील जमीन खरेदी केली होती. ही जमीन बेलकुंडी मठाला इनाम दिलेली होती. मठाचे पूर्वीचे महंत रणजित व्यंकागिरी होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांनी जमिनीवर स्वत:च्या मालकीची परस्पर नोंद करून घेऊन त्या जमिनी विकल्या. शासनाची आणि न्यायालयाची दिशाभूल करत वेगवेगळे दावे दाखल करून ती जमीन स्वत:ची असल्याबाबत हुकूमनामे करून घेतले. या जमिनी इनामी असून त्यांची विक्री करता येणार नाही असे असतानाही वारसांनी खोट्या खरेदी खता आधारे जमिनीची विक्री केली.  धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्याआधारे सदर जमिनी खरेदी केल्या आणि राजकीय वजन वापरत अधिकार्‍यांसोबत संगनमत करून सदर जमिनीचे खरेदीखत, फेरफार आणि एनए करून घेतला. खरेदीखत करताना कायदेशीर बाबींच्या पूर्तता करण्यात आल्या नाहीत. तसेच, पूस येथील ज्ञानोबा सीताराम कोळी यांचा मृत्यू झालेला असतानाही ते जिवंत आहेत असे दाखवून जमीन खरेदीसाठी त्यांच्या अंगठ्याचा ठसा संमतीपत्रावर लावलेला आहे. इनामी जमिनीच्या या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून शासनाची फसवणूक करून करोडो रुपयांचा अपहार झाला असून सध्या ही सर्व जमीन जगमित्र शुगर मिल्सचे चेअरमन धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे असे राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीत नमूद आहे.  राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यासह चंद्रकांत रणजीत गिरी, ज्ञानोबा सीताराम कोळी, गोविंद सीताराम कोळी, बाबू सीताराम कोळी, उद्धव कचरू सावंत, माणिक तुकाराम भालेराव, विठ्ठल गणपतराव देशमुख, धोंडिराम अण्णा चव्हाण, दिगंबर वसंत पवार, राजश्री धनंजय मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक बाबुराव कराड आणि सूर्यभान हनुमंतराव मुंडे या १४ जणांवर बर्दापूर पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४६५, ४६४, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध आज सकाळी दाखल झालेल्या गुन्ह्याला स्थगिती दिली आहे.