औरंगाबाद - धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आयोजित मोर्चात कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त पाहायला मिळाली. मोर्चाच्या निर्धारित वेळेवर एकही नेते कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात उपस्थित नव्हता. "पिवळं वादळ" धडक मोर्चासाठी राज्य भरातून धनगर बांधव येणार असल्याचा दावा आमदार रामराव वडकुते यांनी केला होता, तो फोल ठरल्याचे मोर्चाला जमलेल्या संख्येवरुन दिसत होते. निर्धारित वेळेनुसार सकाळी ११ वाजता मोर्चा निघणार होता. मात्र मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार रामराव वडकुते, सुरेश वडकुते आणि जगन्नाथ रिठे हे नेतेच वेळेवर न आल्यामुळे धनगर समाजाच्या बांधवाना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले.
धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण देऊन
त्यांचा समावेश आदिवासींमध्ये करावा या प्रमुख मागणीसह, मेंढपाळांना स्वसंरक्षण, वन
विभागात मेंढ्यांसाठी चराई क्षेत्र मोकळे करावे, मेंढपाळांना
स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्यात यावे, धनगर आरक्षण आंदोलकवरील खोटे गुन्हे
मागे घेण्यात यावेत यासाठी धनगर समाजाने विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले होते. भाजप सत्तेत येऊन आता चार-साडेचार वर्षे होत आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला असल्याचे सांगत आमदार वडकुते म्हणाले, ‘मुख्यमंत्री फडणवीसांनी लवकरात लवकर आरक्षणाची घोषणा केली नाही तर धनगर समाज येत्या काळात भाजप सरकारला सत्तेवरुन खाली खेचल्याशिवाय राहाणार नाही.’ मंत्र्यांना राज्यात फिरणे अवघड होऊन जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहेे.
पारंपरिक वेशभूषेत धनगर बांधवांचा सहभाग
कोकणवाडी येथे धनगर समाज बांधव विविध
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. यावेळी वाड्या वस्त्यांवर वाजवण्यात येणारे
पारंपरिक वाद्य सर्वांचे लक्ष
वेधून घेत होते. पोलिस प्रशासनाच्या वतीने कोकणवाडी ते विभागीय आयुक्त कार्यालय
परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.











