औरंगाबाद – धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेवरील आमदार रामराव वडकुते यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.१३) औरंगाबादेत धनगर समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात ५० ते ६० हजार समाजबांधव सहभागी होणार असल्याचा दावा आमदार वडकुते यांनी केला आहे.
१८८ मतदारसंघात धनगर समाजाचा प्रभाव
आमदार रामराव
वडकुते म्हणाले, ‘औरंगाबाद येथे होणाऱ्या मोर्चात मराठवाड्यातील धनगर समाजाचे ५० ते ६० हजार लोक
येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी धनगरांना आरक्षण देऊन त्यांचा समावेश आदिवासींमध्ये
करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री फडणवीसांना आता त्यांच्या आश्वासनाचा विसर
पडला असून त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा आहे.’ सांजवार्ता
ऑनलाईन टीमशी बोलताना आमदार वडकुते म्हणाले, ‘त्यांनी आमच्या मागण्या मान्य न केल्यास याचा
परिणाम त्यांना येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल.’
पुढे बोलताना ते
म्हणाले, कि २८८ पैकी १८८ मतदार संघां धनगर समाजाचे मतदान साधारण १५००० ते सव्वा
लाखांपर्यंत आहे. यामुळे धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात भाजपला एकही मत
मिळणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असा इशाराही आमदार वडकुते यांनी
मुख्यमंत्र्यांना दिला.
समाज विखूरलेला नाही
नुकत्याच स्थापन
झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असणारे गोपीचंद पडळकर यांच्या भाजपविरोधी
भूमिकेने धनगर समाज विखुरला गेलाय का? असे विचारले असता ते म्हणाले, लोकशाहीमध्ये सर्वांना विचार स्वातंत्र्य आहे.
ते त्यांच्या पद्धतीने आणि आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय त्यामुळे समाज विखुरला
जाण्याची अजिबात भीती नाही.











