पैठण, (प्रतिनिधी) बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पैठणमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या विधानामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अखंड बहुजन शिवप्रेमी आणि अखंड मराठा समाज यांच्या वतीने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, एका सार्वजनिक कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी स्वराज्याचा महाराज यांनी कारभार रामदास स्वामी च्या हाती सोपवला होता, असे विधान केले होते. शिवप्रेमींच्या मते, हे विधान पूर्णपणे ऐतिहासिक तथ्यांच्या विपरीत असून जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पसरवण्याचा हा प्रकार आहे.
रामदास स्वामी हे आदिलशाहीचे हेर असल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भातून समोर आले असताना, त्याला महाराजांशी जोडणे हा महाराजांचा अवमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पैठणचे पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जर या प्रकरणी त्वरित कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखंड मराठा समाज आणि शिवप्रेमींनी दिला आहे. या निवेदनावर मराठा सेवा संघाचे दादासाहेब पठाडे, अशोक भागवत, महेश पवार, छावाचे किशोर शिरवत, मराठा महासंघाचे अतिष गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे गणेश पवार, अनिल राऊत, छावाचे साईनाथ कर्डिले, सुभाष नवथर, हरिभाऊ शेळके, विशाल काळे, किरण काळे, किशोर सदावर्ते, अंकुश काळे, पवन शिसोदे, रविंद्र ठोसर, नंदकिशोर मगरे, राहूल पगारे, कलिम करीम पठाण, नारायण किरडे, निलेश उढाण, संदिप हंबर्डे, प्रशांत देशमुख, संजय जाधव, प्रमोद आढाव, गणेश औटे, सुधाकर सुलताने, सुरज गोजरे आणि इतर अनेक शिवप्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-- तक्रारीतील मुख्य मागण्या --
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या घराण्याबद्दल वारंवार खोडसाळ वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांना अशी चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती पुरवणाऱ्या पडद्यामागच्या सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी.
न्यायालयाचा संदर्भ : रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध नसल्याचे औरंगाबाद खंडपीठात पुराव्यानिशी सिद्ध झाले असतानाही, जाणीवपूर्वक असा वाद उकरून काढणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे. या तक्रारीमुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.













