सोलेगाव सबस्टेशनवर ढोरेगाव ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

Foto
महावितरणाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांकडून तात्पुरते स्थगित

गंगापूर, (प्रतिनिधी) :  गणेशवाडी येथून होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी गुरुवारी सोलेगाव सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन केले.

ढोरेगावसाठी सोलेगाव सबस्टेशनवरून स्वतंत्र गावठाण फीडर तातडीने कार्यान्वित करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. ढोरेगाव व गणेशवाडीमधील अंतर अधिक असल्याने थोडा पाऊस किंवा वादळ झाले तरी दिवसभर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. 

यामुळे व्यापाऱ्यांचे व्यवसाय तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वारंवार वीजपुरवठा खंडित होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी अखेर सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत महावितरणचे २५ सप्टेंबरपर्यंत सुधारित फीडर सुरू करण्याचे दिले आश्वासन महावितरण केले.

उपकार्यकारी अभियंता अरविंद काळे, अभियंता नितीन चिचाने तसेच गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी
दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करून वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
महावितरणकडून दहा दिवसांत आवश्यक काम पूर्ण करून २५ सप्टेंबरपर्यंत सुधारित फीडर सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. 

तसेच डीपीडीसी योजनेतून नवीन रोहित्राचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. 

यावेळी माजी संचालक आय्युब पटेल, उपसरपंच पुंजाराम पठाडे, ग्रामपंचायत सदस्य अशपाक पटेल, अशोक शेवाळे, युनूस शेख, गोरख कांबळे, सुरेश पठाडे, विशाल जोशी यांच्यासह ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.