मुंबई : गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताविषयी इटालियन दैनिकाने धक्कादायक दावा केला आहे. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाली नव्हती तर जाणूनबुजून केलेल्या कृत्याचा परिणाम होती, असा निष्कर्ष अपघाताची चौकशी करणार्या तपासकर्त्यांनी काढल्याचं वृत्त इटालियन दैनिक कोरीएर डेला सेराने नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील दोन सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. डीजीसीएचा अधिकृत अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वी कुठलाही निष्कर्ष काढणे, हे अयोग्यच आहे.
काय आहेत मीडिया रिपोर्ट?
इटालियन दैनिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारतीय तपासकर्त्यांनी असे निश्चित केले आहे की १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनचा इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर झालेला अपघात हा यांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता, तर जाणीवपूर्वक केलेल्या कृत्यामुळे होता. अधिकारी आता त्यांचा अंतिम अहवाल तयार करण्याची तयारी करत आहेत. चौकशीत मदत करणार्या अमेरिकन तज्ज्ञांनी या निष्कर्षांचे वर्णन किंवा मोठे यश असे केल्याचे इटालियन वृत्तपत्राने पुढे म्हटले आहे.
कसा झाला होता अपघात?
एअर इंडियाद्वारे चालवले जाणारे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळले होते. या दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रवासी, हवाई कर्मचारी आणि विमान ज्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पडले, तेथील व्यक्तींचाही समावेश होता. या भीषण दुर्घटनेतून फक्त एकच प्रवासी वाचला. त्यानंतर समाजमाध्यमांवर या अपघाताविषयी उलटसुलट तर्कवितर्क सुरुच होते.
जुलै २०२५ मध्ये भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात एका पायलटने इंधन नियंत्रण बंद केल्याच्या कथित घटनेचा उल्लेख केला होता. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, एक पायलट ङ्गङ्घतुम्ही (इंधन) का कापले?ङ्घङ्घ असं विचारतो, तर दुसरा ङ्गङ्घमी नाही तसं केलं ङ्गङ्घ असं उत्तर देताना ऐकू आल्याचे अहवाल आहेत.
वैमानिकाविषयी काय दावा?
इटालियन वृत्तपत्राने याच वृत्ताचा पुनरुच्चार करत दावा केला, की तपासकर्त्यांना आता असे वाटते की एका वैमानिकाने इंजिन इंधन नियंत्रण स्विच बंद केले होते, ज्यामुळे विमानाची शक्ती गेली आणि ते जमिनीवर कोसळले. कॅप्टन सुमित सभरवाल हे पायलट-इन-कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे सह-वैमानिक होते.
अहवालात पुढे लिहिले आहे की, ङ्गङ्घजबाबदारी अजूनही अस्पष्ट आहे. मुख्य संशयित कॅप्टन सुमित सभरवाल आहे. अपघाताच्या एका महिन्यानंतर त्याच्याविषयी समोर आलं, की तो नैराश्यग्रस्त होता.ङ्घङ्घ
एएआयबीच्या प्राथमिक निष्कर्षांनंतर वैमानिक संघटनांनीही निषेध व्यक्त केला होता, तर सुमित सभरवाल यांच्या वडिलांनी आरोप फेटाळून लावत नव्याने चौकशीची मागणी केली होती. त्यांनी आपल्या मुलाच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या अफवांचेही खंडन केले होते. घटस्फोटासह वैयक्तिक समस्यांमुळे चिंता किंवा नैराश्य निर्माण झाल्याच्या चर्चाही त्यांनी उडवून लावल्या होत्या.
इटालियन दैनिकाच्या मते, अंतिम तपास अहवालात वैमानिकांचे सातत्याने मानसिक मूल्यांकन आणि मानसिक आरोग्य देखरेखीबाबतच्या शिफारशींचा समावेश असण्याची अपेक्षा आहे.
अपघातानंतरच्या काही आठवड्यात तांत्रिक बिघाडापासून ते मानवी चुकांपर्यंत अनेक सिद्धांत मांडले गेले. कालांतराने तपासकर्त्यांनी त्यांचे लक्ष कॉकपिटमधील इंधन नियंत्रण स्विचवर केंद्रित केले.