शिवना टाकळीचे कालवे फोडणाऱ्यांवर आता थेट गुन्हे

Foto
अधिकाऱ्यांनी दिला इशारा

कन्नड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सर्वांत मोठ्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठी उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. मात्र, काहींनी रातोरात कालवे फोडून पाणी पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा थेट फटका शेवटच्या टोकावरील (टेल एंड) शेतकऱ्यांना बसत आहे. या पाणीचोरीची गंभीर दखल घेत कालवा फोडणाऱ्यांविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रकल्प प्रशासनाने बुधवारी (दि. ११) दिला.
सद्यःस्थितीत डाव्या कालव्यातून ३० क्युसेक, तर उजव्या कालव्यातून तब्बल १३० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

उजव्या कालव्याचे आवर्तन ८ फेब्रुवारीपासून, तर डाव्या कालव्याचे आवर्तन गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. १० किलोमीटर लांबीच्या वैसपूर, देवळाणा, कालव्यामुळे लव्हाळी, देभेगाव, तांडपिपळगाव आणि देवगाव रंगारी या गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, कालव्याला ठिकठिकाणी पाडलेल्या भगदाडांमुळे शेतांना मिळण्याऐवजी पाणी इतरत्रच वाहून जात आहे.

-- केवळ ४० किलोमीटरपर्यंतच पाणी -- 
प्रकल्पातून उजव्या कालव्यात १३० क्युसेक क्षमतेने पाणी सोडले जात असले, तरी 'हेड टू टेल' (शेवटपर्यंत) पाणी पोचण्याचे प्रशासनाचे उदिष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही. ५५ किलोमीटर लांबीच्या या कालव्याचे पाणी आजतागायत केवळ ४० किलोमीटरवरील पार्थी गावापर्यंतच कसेबसे पोचले आहे. काही ठिकाणी हेतुपुरस्सर कालवा व पोटचाऱ्या फोडून पाणी शेतात वळवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. यामुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. पुढील १५ किलोमीटरवरील शेतकरी हक्काच्या पाण्याला मुकण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि पिकांची गरज ओळखून दोन्ही कालव्यांतून आवर्तन सोडले आहे. मात्र, काही अज्ञात व्यक्तींकडून हेतुपुरस्सर कालवे फोडून पाण्यावा अपव्यय केला जात आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. गेल्या वर्षीही आम्ही अशा पाणीचोरांवर गुन्हे नोंदवले होते. आता पुन्हा खिर्डी, सासेगाव परिसरात असे प्रकार आढळून आले असून, दोर्षीची अजिबात गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
शिशिर गांजाळे, शाखा अभियंता, शिवना टाकळी प्रकल्प