छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांत सुरू असलेल्या नवीन ड्रेनेजलाईनच्या कामात खोडा घालणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा कडक पवित्रा महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शेतातून किंवा डीपी रस्त्यातून विरोध करणाऱ्या डुन जलाईन टाकण्यास नागरिकांना प्रथम समजावून सांगावे; मात्र त्यानंतरही त्यांनी सहकार्य न केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे अंतर्गत विकासकामांना जाणीवपूर्वक खिळ घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहरात केंद्र व राज्य सरकारच्या मअमृतफ व मनगरोत्थानफयोजनेतून तब्बल ८६१ कोटी रुपयांच्या ड्रेनेजची कामे सुरू
आहेत. या प्रकल्पात महापालिकेचा ३० टक्के स्वहिस्सा आहे. या प्रकल्पाचे काही भागातील ९० टक्क्यांपर्यंत तर काही भागांत ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी नागरिकांकडून कामात अडथळा आणून काम बंद पाडण्याचे प्रकार समोर आले आहेत. यासंदर्भात आयुक्त येडगे यांनी सांगितले की, सातारा परिसरात एका शेतकऱ्याने शेतातून ड्रेनेजलाइन नेण्यास विरोध केला. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची समजूत काढली. जमिनीच्या तीन फूट खाली महसूल प्रशासनाचा अधिकार असतो, हे कायदेशीर वास्तव पटवून दिल्यानंतर शेतकऱ्याने कामाला परवानगी दिली.
आयुक्तांचा इशारा
विकासकामांमध्ये खोडा घालणाऱ्यांना आधी प्रशासकीय पातळीवर समजावून सांगितले जाईल. मात्र, तरीही अडवणूक कायम ठेवल्यास थेट पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागेल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.













