मराठा-धनगर आरक्षण, दुष्काळाच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

Foto

मुंबई -  सरकार दुष्काळावर ठोस निर्णय जाहीर करत नाही. दुसरीकडे, मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरही बोलायला तयार नाही असा आरोप विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी सभागृहात केला. त्यांनी या मुद्द्यांवर स्थगन प्रस्ताव आणण्याची केलेली विनंती दुसऱ्यांदा फेटाळली गेली. यामुळे विरोधक आक्रमक झाले. सुरवातीला एका तासासाठी नंतर दोनवेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांसाठी तिजोरी रिकामी करा, धनंजय मुंडे आक्रमक

सरकारकडून आम्हाला ठोस निर्णय हवा आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना ५० हजार आणि बागायतदार शेतकऱ्यांना अनुदान म्हणून १ लाख रुपये हेक्टरी देणार की नाही, त्यांचे वीजबिल माफ करणार की नाही, दुष्काळग्रस्त भागातील विदयार्थ्यांची फी माफ करणार की नाही असे सवाल करत  मुंडेंनी सरकारला कोंडीत पकडले. ते म्हणाले, आम्हाला दुष्काळावर राजकारण करायचे नाही परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करु नये.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबद्दल निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा देत विरोधी पक्षनेते मुंड म्हणाले, शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल परंतु सरकारने ठोस निर्णय घ्यावा, तरच सभागृह चालू देवू.

 

दुष्काळ आणि आरक्षणावर स्थगन प्रस्तव

हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळ आणि आरक्षणावर सरकारला कोंडीत पकडले आहे. सुरुवातीला दुष्काळ आणि आरक्षणावर स्थगन प्रस्ताव मांडला होता परंतु तो स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला मात्र शेतकऱ्यांना आणि मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आजही धनंजय मुंडे यांनी दुष्काळ आणि आरक्षणावर स्थगन प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर आणि सरकार दुष्काळ व आरक्षणावर ठोस निर्णय घेत नसल्याने सरकारवर ताशेरे ओढले.

 

अहवालात काय आहे ते कळू द्या

मराठा आरक्षणा संदर्भातील मागास आयोग अहवाल आणि धनगर समाजाबाबतचा टीसच्या अहवालामध्ये काय आहे हे आम्हाला कळायला हवे. अशी ठोस भूमिका धनंजय मुंडे यांनी सभागृहात मांडली. एकीकडे मराठा समाजाला १ डिसेंबरला जल्लोष करा म्हणायचे आणि दुसरीकडे मराठा समाजाने काढलेल्या मोर्चातील नेत्यांची धरपकड करायची ही कुठली निती असा सवालही मुंडे यांनी सरकारला केला.

 

दुष्काळ आणि आरक्षणाच्या मुद्दयावर सोमवारीही विरोधीपक्षाच्या आमदारांनी विधानपरिषदेचे सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी दुष्काळ आरक्षणावर जोरदार घोषणाबाजी केल्याने सुरुवातीला अर्ध्या तासासाठी व त्यानंतर दोन वेळा व शेवटी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.