गंगापुरला सुमित मुंदडा यांच्या पुढाकाराने ४ हजार नागरिकांना एनसीएमसी बसकार्डचे वितरण
गंगापूर (प्रतिनिधी) : जामगाव सर्कलमध्ये माजी उपसभापती सुमित रामेश्वर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित विशेष कॅम्पमधून तयार करण्यात आलेल्या ४ हजार ६५७ एनसीएमसी बस कार्डाचे वितरण सुरू केले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ आज गळनिंब व भिवंधानोरा येथे मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना बस प्रवासासाठी आधुनिक व सुलभ सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध गावांमध्ये विशेष कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांचे एनसीएमसी बसकार्ड तयार करण्यात आले. कार्ड वितरणाच्या पहिल्या टप्प्यात गळनिंब व भिवधानोरा येथील लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले.
तसेच उद्यापासून ज्या गावांमध्ये कॅम्प आयोजित करण्यात आले होते, त्या सर्व गावांमध्ये लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन कार्ड वितरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शिवचरण राजपूत, रामेश्वर मार्कड, गणेश पडगण, आनंद तुपे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी परिश्रम घेतल्याचे सांगण्यात आले.