सिद्धेश्वर यात्रेत १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : महाशिवरात्र पर्वावर पैठण येथे भरणाऱ्या सिध्देश्वर यात्रेत यंदा तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी दानशूर शिवभक्तांनी दरवर्षी प्रमाणे साबुदाणा, तेल, शेंगदाणा, बटाटा, मिरची आदी साहित्यांचा पुरवठा करावा. असे आवाहन संयोजक आशिष पवार व फौजदार जाधव यांनी केले आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार पैठण येथील गोदावरी नदीच्या काठावरील सिध्देश्वर महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्र पर्वावर दरवर्षी मोठी यात्रा भरते.

अत्यंत जागृत समजल्या जाणाऱ्या या महादेव मंदिरात भल्या पहाटे पासून धार्मिक विधी सुरू होतात. मराठवाडा भरातून येथे शिवभक्त दर्शनासाठी येतात. महिला व पुरुष यांच्या स्वतंत्र रांगा लावून दिवसभर शिवलिंग दर्शनासाठी झुंबड उडालेली असते. विशेष म्हणजे दरवर्षी येथे हजारो किलो उपवासाची साबुदाणा खिचडी मोफत वाटप केली जाते. गतवर्षी १३ क्विंटल साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचा लाभ हजारो शिवभक्तांनी घेतला. यासाठी अनेक हिंदू 
संस्था-संघटनांसह शेकडो भाविकांनी सढळ हाताने मदत केली होती.

या पार्श्वभूमीवर सिध्देश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी सुरु असुन मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा १५ क्विंटल साबुदाणा खिचडी वाटप करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ८ क्विंटल साबुदाणा, ३ किलो शेंगदाणा, १७ किलो खाद्यतेल, ४ किलो बटाटे व २ किलो हिरवी मिरची आवश्यक आहे. भाविकांनी या दोन दिवसात ही मदत पोहोच करावी. असे आवाहन मुख्य संयोजक फौजदार कारभारी जाधव यांनी केले आहे. यासाठी आशिष पवार, दिनेश माळवे व कुणाल गुरव हे परिश्रम आहेत.