दादेगाव येथे लहान बालकांना जंतनाशक औषध, गोळ्यांचे वाटप

Foto
पैठण (प्रतिनिधी) : जन आरोग्य समितीचे सदस्य शुभम इंगळे यांच्या हस्ते बालकांना जंतनाशक औषध व गोळ्या देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला प्राथमिक आरोग्य केंद्र नांदर अंतर्गत दादेगाव बुद्रुक येथील अंगणवाडी कार्यालयात जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ जन आरोग्य समितीचे सदस्य शुभम इंगळे यांच्या हस्ते बालकांना जंतनाशक औषध देऊन करण्यात आला. 

या मोहिमेचा मुख्य उद्देश बालकांना जंतसंसर्गापासून मुक्त ठेवणे, त्यांचे आरोग्य सुदृढ राखणे आणि शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना देणे हा आहे. जंतसंसर्गामुळे बालकांच्या पोषणावर, वाढीवर आणि एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बालकांना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जंतनाशक औषध देण्यासोबतच स्वच्छतेच्या सवयी, शुद्ध पाण्याचा वापर आणि संतुलित आहार याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.

 निरोगी बालक म्हणजे निरोगी समाजाचा पाया या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या अशा आरोग्यविषयक मोहिमा बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. पालकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

या कार्यक्रमाला डॉ. जाधव, डॉ. राऊत सिस्टर आरोग्य विभागातील आशा कार्यकर्त्या सरला शिंदे, अंगणवाडी सेविका सारिका हजारे, अर्चना माळी, वंदना थोटे, रेखा हजारे तसेच अंगणवाडीतील लाभार्थी बालक उपस्थित होते. बालकांच्या निरोगी आणि सुदृढ भविष्यासाठी आरोग्य विभागाच्या अशा उपक्रमांना पालकांनी सहकार्य करावे, हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात आला.