औरंगाबाद - निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान न देणाऱ्या बँक व्यवस्थापकाची तातडीने उचलबांगडी झाली आहे. यानंतरही बँक ऑफ इंडियाच्या कामकाजात सुधारणा न झाल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. सामान्यांना त्रास देणाऱ्या बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नसल्याची तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर अधिकारी ताळ्यावर आल्याचे दिसले.
गेल्या काही महिन्यांपासून केवायसीच्या नावाखाली बँक ऑफ इंडियाचे अधिकारी निराधारांचा अक्षरशः छळ करत आहेत. लाभार्थी बँक अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे एक-एक कागद जोडून बँकेत चकरा मारत राहिले मात्र त्यांच्या खात्यात छदामही पडला नाही. यामुळे वैतागलेल्या निराधार विधवा, महिला आणि नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. बँक व्यवस्थापकाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली, मात्र तरीही बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक ताकास तुर लागू देत नव्हते.
निराधारांना पैसे वेळेवर न देणे, अपमानास्पद वागणूक देऊन बँकेतून हाकलून लावणे असे प्रकार घडू लागले होते. जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेत बुधवारी (ता. २८) बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक इंगळे यांना पाचारण केले. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत बँक ऑफ इंडियावर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. निराधारांचे केवायसी करुन घेण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग आणि काही मशीन बंद असल्याचे सांगत व्यवस्थापकांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, असे चालणार नाही, तातडीने मशीन्स बदला आणि कामे सुरू करा अशी तंबीच जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली बँक अधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतर बँक ऑफ इंडियाचे अधिकारी सुतासारखे सरळ झाले. रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन विभागीय व्यवस्थापकांनी दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, तहसीलदार अनिता भालेराव, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक इंगळे उपस्थिती होते.












