गंगापूर, (प्रतिनिधी) ः राज्य शासनाने नव्याने स्थापन केलेल्या कार्यालयांच्या मुख्यालयाचे ठिकाण व कार्यक्षेत्र निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गंगापूर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षक मुख्यालय संभाजीनगरऐवजी कन्नड येथे निश्चित करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भूमी अभिलेख विभागाशी संबंधित विविध कामांसाठी गंगापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधणे सोयीचे होते. मात्र, आता मुख्यालय कन्नड येथे झाल्याने नागरिकांना सुमारे 90 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भार शेतकऱ्यांवर पडणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जमिनीचे मोजमाप, फेरफार, नकाशे, अभिलेख दुरुस्ती तसेच इतर महसूल व भूमी अभिलेख विषयक कामांसाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात जावे लागते. अशा परिस्थितीत कन्नडपर्यंतचा प्रवास अनेकांसाठी गैरसोयीचा ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
गंगापूर तालुक्याचा भौगोलिक व प्रशासकीय विचार करून भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगरशीच संलग्न ठेवावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









