फुलंब्री, (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला उजाळा देण्यासाठी कर्मयोगी शेषराव पाटील गायकवाड स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने रामेश्वर विद्यालय, वाघोळा तालुका फुलंब्री येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा सोमवारी (दि.१२) रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या प्राथमिक गटात ६६ व इयत्ता नववी ते बारावीच्या माध्यमिक गटात ४० अशा एकूण १०६ शाळेतील १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सर्वप्रथम माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यार्थी संकेत वाहटुळे यांच्या हस्ते स्पर्धा शुभारंभ झाला. या प्रसंगी सर्जेराव ठोंबरे, निवृत्ती गावंडे, आगाजी अंभोरे, सोमीनाथ गायकवाड, भास्कर गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेचे आयोजक विकास गायकवाड यांनी स्पर्धेच्या आयोजना मागील भूमिका विषद केली तर स्पर्धा परीक्षक उज्वलकुमार म्हस्के यांनी स्पर्धे ची नियमावली सांगितली. या स्पर्धेसाठी गावातील सरकारी कर्मचाऱ्यांची ऑनलाईन हजेरी ग्राम विकासासाठी गरज की पर्याय, गाव बदलले तर भारत बदलेल का?, शहराकडे जाणाऱ्या पावलांना गावाकडे वळविता येईल का?, दुष्काळाला जबाबदार कोण (कारणे आणि परिणाम) असे एकूण चार विषय देण्यात आले होते.
दोन्ही गटामध्ये एकापेक्षा एक सरस स्पर्धकांनी निवडलेल्या विषयानुसार विषय मांडणी करतांना उदाहरणे, संदर्भ, आकडेवारी यांचा वापर करत प्रभावीपणे सादरीकरण केले.
प्राथमिक गटात प्रथम तनुजा गजेंद्र पाटील (कृष्णतारा इंग्लिश स्कूल, कन्नड), द्वितीय क्रमांक आराधना पुरी (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, डोंगरगाव कवाड, तालुका फुलंब्री), तृतीय क्रमांक जय पांडुरंग फरकाडे (न्यू हायस्कूल बनकिन्होळा ता- सिल्लोड), चतुर्थ क्रमांक संस्कृती निलेश अकोलकर (काशीनाथ पाटील विद्यालय, कन्नड) पाचवा क्रमांक खुशी मोकासे (शांती निकेतन विद्यालय, पिशोर (ता. कन्नड) उत्तेजनार्थ भक्ती वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (गांगदेव) यांनी पटकाविला.
माध्यमिक गटात प्रथम क्रमांक तन्वी कदम (सिद्धेश्वर हायस्कूल माणिक नगर ता. सिल्लोड), द्वितीय क्रमांक माधुरी गायकवाड (श्री रामेश्वर विद्यालय वाघोळा ता. फुलंब्री) तृतीय क्रमांक-गायत्री थाले (स्वामी परमानंद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी राजा ता. छत्रपती संभाजीनगर) उत्तेजनार्थ निकिता आगलावे (महारुद्र हायस्कूल कुंभेफळ) व उत्तेजनार्थ प्राची अकोलकर (स्व. केके जाधव हायस्कूल कन्नड) यांनी पटकाविला.
या स्पर्धे चे परीक्षक म्हणून उज्वलकुमार म्हस्के, शैलेश गवई, रवींद्र तम्मेवार, योगेश डोईफोडे, किरण निकम, व्ही. एस. खोमणे यांनी निष्पक्षपणे परीक्षण केले. या वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक राऊत, कैलास व्यवहारे, संतराम मोरे, संदेश सोनवणे, गौतम पाखरे, भास्कर गायकवाड व शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन संतराम मोरे बळीराम मुरमे यांनी तर स्पर्धक नोंदणी व प्रमाणपत्र लेखन कैलास व्यवहारे यांनी केले. स्पर्धा आयोजक विकास गायकवाड यांनी जिल्ह्यातील सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक, शिक्षक, पालक आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले.














