विभागीय आयुक्तांनी घेतला आठही जिल्ह्यांचा मतदान आढावा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भय व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
 शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर रोजी होणार्‍या मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने विभागातील आठही जिल्ह्यांचा आढावा घेतला. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांतील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. 
मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी आवश्यक व्यवस्था, मतदान साहित्याची उपलब्धता, अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती तसेच मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेची माहिती यावेळी घेण्यात आली. 
मतदान केंद्रांच्या परिसरात राजकीय पक्षांच्या बूथ व्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचाही आढावा घेण्यात आला. निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकार्‍यांनी सतर्क राहावे. मतदानाच्या दिवशी उद्भवणार्‍या संभाव्य अडचणींवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावेळी दिले.