पैठण, (प्रतिनिधी) : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे राज्य शासनाने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. दिवाळी आली असताना प्रत्यक्षात तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही तसेच पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी कोरडीच गेली आहे. तालुक्यातील १९० गावांतील शेतकऱ्यांसाठी १०१ कोटींची मागणी केली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली.
पैठण तालुक्यात मध्यंतरी अतिवृष्टी झाल्याने हजारो हेक्टरवरिल पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यात १९० गावांतील ९६००० शेतकऱ्यांना फटका बसला होता. यामध्ये ७२००० जिरायत, २४४ बागायत व १६०३० हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्या होत्या. याची भरपाई म्हणून शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान देवू असे जाहिर केले होते. परंतु, दिवाळी सुरू झाली असतानाही अद्याप एकाही शेतकऱ्याला अनुदान प्राप्त झाले नाही. शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टीचे अनुदान दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात
टाकले जाणार होते.
मात्र अद्याप अनुदान प्राप्त झाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. शेतकऱ्यांनी उसनवारी करून करून दिवाळी साजरी केली. तहसील प्रशासनाने सर्व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची यादी तयार केली. मात्र अनुदान आले नसल्याचे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही. शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचा अंत बघू नका, पैठण तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीने पूर्ण आर्थिक कोलमडून गेला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नाही अन्यथा सामान्य शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी दिला आहे.














