दिवाळीला काळाचा घाला! झारखंडमध्ये तिघांचा तर हैदराबादमध्ये ३ मजुरांचा मृत्यू

Foto
रांची : झारखंडमध्ये एक भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिरा पोलीस स्टेशन हद्दीतील लचरागढ़ येथील देव नदीच्या पुलावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बानोहून लचरागढ़च्या दिशेने जाणारी एका भरधाव बोलेरो आणि समोरून येणार्‍या बाईकची जोरदार धडक झाली.

अपघातानंतर बाईकवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बोलेरो आणि बाईकची टक्कर इतकी भीषण होती की बाईकवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच कोलेबिरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासनाने तिन्ही तरुणांचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. 

सध्या पोलीस या संपूर्ण अपघाताचा तपास करत आहेत. या अपघाताच्या अवघ्या ४८ तास आधी, गुरुवारी रात्री खूंटी जिल्ह्यातील कर्रा पोलीस स्टेशन हद्दीतील कर्रा-तोरपा मुख्य रस्त्यावर एका ट्रकने तब्बल ९ जणांना चिरडलं होतं, त्यापैकी ७ जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

झारखंडमधील खूंटी जिल्ह्यात गुरुवारी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने अनेक लोकांना उडवलं. या अपघातात तीन लहान मुलं आणि तीन महिलांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ट्रकचा वेग अत्यंत जास्त होता आणि तो अनियंत्रित झाल्याने लोकांना चिरडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर शोक व्यक्त केला होता.

हैदराबादमध्ये ३ मजुरांचा मृत्यू, १० जणांची प्रकृती गंभीर


तेलंगणातील हैदराबादमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. आउटर रिंग रोडवर  हिमायत सागरजवळ १७ जणांना घेऊन जाणार्‍या एका ऑटो-रिक्षाची समोर असलेल्या ट्रकशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक ऑटोमधील सर्व प्रवासी हे मजूर होते. ते मुचिंतल येथील एका इमारतीचं पेंटिंग पूर्ण करून परतत होते. प्रवासादरम्यान ऑटो-रिक्षा अचानक समोर असलेल्या ट्रकला मागून आदळली. धडक इतकी जोरदार होती की ऑटोच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
प्राथमिक तपासानुसार, वाहन चालवताना ऑटोचालकाला डुलकी लागली असावी, ज्यामुळे हा भयानक अपघात घडला. घटनेनंतर तात्काळ १४ जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी १० जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. 

अपघातानंतर ट्रकचालकाने गाडी न थांबवता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आउटर रिंग रोडच्या सुरक्षा रक्षकांनी ट्रॅकचा २० किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्याला पकडलं. राजेंद्रनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.