लबाडांसाठी जीवाची बाजी लावू नका ; राज ठाकरे यांचा अण्णांना सल्‍ला

Foto
राळेगणसिद्धी । नरेंद्र मोदींचं सरकार हे आजवरचं सर्वात खोटारडं सरकार आहे. अशा निर्दयी सरकारसाठी अण्णांनी आपल्या जीवाची बाजी लावू नये. अण्णांनी आपला जीव धोक्यात घालू नये. उपोषण सोडावे, असा सल्‍ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अण्णा हजारे यांना दिला. 
लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांची राज ठाकरे यांनी आज भेट घेऊन चर्चा केली. 

अण्णांच्या आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा आहे, असे जाहीर करतानाच, या आंदोलनातून चांगले काहीतरी घडेल, अशी अपेक्षाही राज यांनी यावेळी व्यक्‍त केली. त्यानंतर राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्‍लाबोल चढवला. तेे म्हणाले, या नालायकांसाठी अण्णा जीवाची बाजी लावू नका. ही अत्यंत खोटारडी, ढोंगी माणसं आहेत. नरेंद्र मोदी या माणसावर विश्‍वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका. नवी दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही राज यांनी जोरदार टीका केली. केजरीवाल काळे की गोरे हे देशाला माहीत नव्हते. आज ते अण्णांमुळेच मुख्यमंत्री झाले. त्यांनी अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करायला यायला हवे होते;पण तेही कृतघ्न निघाले,असे राज म्हणाले.

नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल यांच्यावर शरसंधान 
अण्णांची भेट घेतल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीसह अण्णांच्या आंदोलनातून राजकारणात आलेल्या व मुख्यमंत्री झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळेच नरेंद्र मोदींसह अनेक जण आज सत्तेत आहेत;परंतु सत्ता आल्यानंतर त्यांना आश्‍वासनांचा विसर पडला आहे. भाजपच काय, काँग्रेस-राष्ट्रवादी सगळेच ढोंगी आहेत. माणसं वापरणं आणि फेकून देणं हेच यांना माहीत आहे. अण्णा जगले काय आणि मेले काय यांना काहीच फरक पडत नाही. असल्या निर्लज्ज लोकांसाठी अण्णांनी जिवावर बेतेल असे काही करू नये. उपोषण सोडून ही राजवट गाडून टाकण्यासाठी काय करता येईल ते करावे, असे राज म्हणाले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker