मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ११ फेब्रुवारी रोजी होणार्या या निवडणुकीआधी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या आधी शहर सोडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ९ फेब्रुवारीला होणार्या आंगणेवाडीच्या जत्रेमुळे कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक बाहेरगावी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत पक्षांकडून अतिरिक्त सावधगिरी बाळगली जात आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसतानाही त्यांनी खबरदारीचा पवित्रा घेत नगरसेवकांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबई सोडू नका, असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटाकडूनही आपल्या नगरसेवकांना तत्सम आदेश देण्यात आले आहेत. ८ फेब्रुवारीला रविवार असल्याने काही नगरसेवक जत्रेसाठी रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, १० फेब्रुवारीपर्यंत अनिवार्यपणे मुंबईत हजर राहा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. महापौर निवडणूक तोंडावर असताना संख्या अबाधित ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी नगरसेवकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईतील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर ठरला आहे. ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र याआधी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढणार्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अजित रावराणे यांच्याकडून मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला आहे.
मुंबईत ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल २५ वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत ( २०२६) भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. ८९ जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला २९, काँग्रेसला २४, मनसेला ६, एमआयएमला ८, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाला १, समाजवादी पार्टीला २ जागा जिंकल्या.