छत्रपती संभाजीनगर : 'कॉकरोच जनता पार्टी'चे (संस्थापक अभिजीत दिपके आणि एक पोलीस अधिकाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. आपल्या निवासस्थानी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. इतकेच नव्हे तर संतप्त झालेल्या अभिजीत दिपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला थेट घराबाहेर जाण्यास सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज (दि.07) अभिजीत दिपके यांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलीस उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप केला.
मी कोणाला भेटायचं हे पोलीस ठरवणार नाहीत
"पोलिसांनी मला सांगायचे नाही की मी कोणाला भेटायचे? मी कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे मी ठरवणार," अशा आक्रमक शब्दांत दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्याला सुनावले. तसेच, "तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? कोणत्या पोलीस ठाण्याचे आहात? तुमचे पद काय आहे?" अशी थेट विचारणा करत अभिजित दिपके यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले. नागरिक आपल्याला भेटायला येत असताना पोलीस त्यात हस्तक्षेप करत असल्याचा राग व्यक्त करत, "तुम्ही बाहेर जा," असे म्हणत त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला आपल्या घराच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितले.
अभिजीत दिपकेंचा आरोप
दरम्यान, दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात एआय टूलच्या सादरीकरणासाठी वैयक्तिक माहिती उघड केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. आपली माहिती उघड करण्याची परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. कार्यक्रमात सरकारी अधिकारी होते आणि त्यांच्यासमोर हा प्रकार घडल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. याशिवाय सरकार अमेरिकन कंपन्यांच्या माध्यमातून आपल्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.












