नवी दिल्ली : पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही, तर त्यांना ठरवावे लागेल की त्यांना भूभागाचा भाग बनायचे आहे की इतिहासाचा, असा इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला दिला. गेल्या वर्षी झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी माणेकशॉ सेंटरमधील लष्करी कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताची आक्रमक भूमिका पुन्हा एकदा जगासमोर मांडली.
गेल्या वर्षी ७ मे रोजी पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. या कारवाई अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते. दोन्ही देशांमधील हा लष्करी संघर्ष ८८ तास चालला होता, यामध्ये हवाई दल, नौदल आणि लष्कराने एकत्र येत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. अखेर १० मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये करार झाल्यानंतर ही लढाई थांबली.
आता या कारवाईला एक वर्ष पूर्ण होत असताना लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले आहे की, जर पाकिस्तानने आपली रणनीती बदलली नाही, तर आगामी काळात भारतीय लष्कर 'ऑपरेशन सिंदूर'पेक्षाही कितीतरी पटीने अधिक कठोर आणि वेगवान प्रत्युत्तर देईल.
पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा
पाकिस्तानने शांतता आणि विकासाचा मार्ग निवडायचा की दहशतवादाला पाठिंबा देत राहायचे, हे ठरवले पाहिजे. भारताला नेहमीच शांतता हवी आहे, परंतु जर पाकिस्तानने दहशतवाद पसरवणे सुरूच ठेवले, तर भारत त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही लष्कर प्रमुख म्हणाले.
भारतीय लष्कर आता पूर्णपणे सज्ज आहे. लष्करप्रमुखांनी सांगितले की, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास लष्कर अधिक वेगाने आणि अधिक जोमाने प्रत्युत्तर देईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचे प्रदर्शन केले. देशात दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता धोरण अवलंबले आहे. लष्कर कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
विधानाला एवढे का महत्व?
मागील वर्षी झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्षे पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर हे विधान समोर आले आहे. यातून पाकिस्तानला एक स्पष्ट संदेश जातो की, भारत विसरलेला नाही किंवा कमकुवत झालेला नाही. भारताची भूमिका आता पूर्वीपेक्षाही कठोर झाली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही देशाला भारत आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी प्रत्युत्तर देईल.