घरगुती सिलेंडर आणखी महागणार... सरकार म्हणाले, प्रत्येक सिलेंडरमागे ७०० रुपयांचा होतोय तोटा !!

Foto
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार आहे. मात्र, एलपीजी सिलेंडरचे दर आणखी वाढण्याच्या संकेत आहेत. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरनंतर घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्यानंतर केंद्र सरकारने दरवाढीचे कारणही सांगितले आहे. त्यामुळे दर आणखी वाढण्याचीच शक्यता दिसत आहे.  तेल वितरक कंपन्यांनी ७ जूनच्या रात्रीपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती २९ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे देशभरात घरात स्वयंपाकासाठी वापरला जाणारा सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

केंद्र सरकारने वाढत्या दराबद्दल काय सांगितलं?
घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरबद्दल केंद्र सरकारने भूमिका मांडली आहे. भारतात घरातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या गॅसच्या किंमती जगात सर्वात कमी आहेत. शेजारील देशांच्या तुलनेत फक्त भारतातच सिलेंडरच्या किंमती सर्वात कमी आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यासारख्या विकसित देशांच्या तुलनेत भारतात एलपीजी सिलेंडर खूपच कमी दरात मिळत आहे. एक सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी जवळपास १६०० रुपयांपेक्षा जास्त खर्च होत आहे. याचा परिणाम म्हणून घरगुती वापरायच्या प्रत्येक सिलेंडरमागे ७०० रुपयांचे नुकसान होत आहे. फेब्रुवारी आणि जून २०२६ मध्ये या काळात एलपीजी सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइसमध्ये जवळपास ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाले आहेत, असेही सरकारने म्हटले आहे. 

होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक करणे कठीण झाल्याने आखाती देशांमधून पुरवठा कमी झाला आहे, त्यामुळे १४.२ किलोच्या सिलेंडरचा खर्च खूप वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून सर्वसामान्य ग्राहकांसाठी किंमत ९४२ रुपये प्रति सिलेंडर अशी करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. दरम्यान तेल वितरक कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आल्यानंतरही सरकारकडून ७०० रुपये तोटा होत असल्याचे सांगितले आहेत. याचा संबंध विश्लेषक आणखी भाववाढीशी लावत आहेत. तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

तीन महिन्यात दुसर्‍यांदा वाढल्या किंमती
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताच्या तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने महागाईत आणखी तेल ओतले गेले आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमती तीन महिन्यात दुसर्‍यांदा वाढल्या आहेत. ७ मार्च रोजी प्रति सिलेंडर ७० रुपयांनी दर वाढवण्यात आले होते, आता २९ रुपयांनी त्यात वाढ करण्यात आली आहे.

राजकीय किंमत सत्ताधार्‍यांना योग्य वेळी कळेल
दरम्यान केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. या दरवाढीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, सातत्यानं हे दर वाढवतायेत, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असं सांगितलं. पण, नियंत्रित याचा अर्थ टप्प्या टप्प्यानं हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधार्‍यांना योग्य वेळी कळेल, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. 

दिल्ली आणि मुंबईतील नवीन दर काय?
दरम्यान, या नव्या दरवाढीनंतर आता राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९१३ रुपयांवरून थेट ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. तर देशातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतही २९ रुपयांचीच वाढ झाली असून, मुंबईतील दर ९१२.५० रुपयांवरून ९४१.५० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अगोदरच मेटाकुटीला आला असताना, आता गॅस सिलेंडरच्या दरांनी गरिबांचे कंबरडे मोडले आहे.