डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी बलात्कारी नाही..., माझ्यावरील आरोप गोळीबारापेक्षाही भयंकर !

Foto
 वॉशिंगटन : व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डन्ट्स डिनरदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या थरारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले असून, मी बलात्कारी नाही, अशा शब्दांत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तसेच, सध्याच्या घडीला डेमोक्रॅटिक पक्षाकडून केली जाणारी द्वेषपूर्ण भाषणे ही राष्ट्रासाठी प्रत्यक्ष गोळीबारापेक्षाही मोठा धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्या घटनेची आठवण करून देताना ट्रम्प म्हणाले की, गोळीबाराचा आवाज येताच मी आणि फर्स्ट लेडी सुरक्षिततेसाठी ताबडतोब जमिनीवर आडवे झालो. सुरक्षा कर्मचार्‍यांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि हल्लेखोराला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. मला नेमके काय घडतेय हे पाहायचे होते, परंतु सुरक्षेसाठी कर्मचार्‍यांनी मला पूर्णपणे घेरले होते. त्यांच्या चपळाईमुळे आणि चोख कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.

हल्लेखोराबद्दल माहिती देताना ट्रम्प यांनी धक्कादायक खुलासा केला. हल्लेखोर हा पूर्वी एक निष्ठावान ख्रिश्चन होता. मात्र, अचानक तो कट्टर ख्रिश्चन-विरोधी विचारसरणीकडे वळला. त्याच्या स्वभावात झालेला हा बदल अत्यंत धक्कादायक होता,  तो इतका चपळ होता की त्याला चक्क एनएफएलसंघात स्थान द्यायला हवे होते. संबंधित हल्लेखोराच्या संशयास्पद वागणुकीबद्दल त्याच्या कुटुंबाने पोलिसांना आधीच कल्पना दिली होती, असा दावाही त्यांनी केला.

चीन आणि इराण संघर्षावर भाष्य
दुसरीकडे, फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय धोरणांवर प्रकाश टाकला. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षात चीनची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. ङ्गङ्घचीन या प्रकरणात मदत करत आहे. परंतु, ते यापेक्षा अधिक चांगले योगदान देऊ शकतात. तरीही, सध्याच्या जागतिक स्थितीबाबत मी फारसा निराश नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.