डोंगराळे अत्याचार आणि खून प्रकरण, आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

Foto
 नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी मालेगाव जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा आज निकाल लागला आहे. कोर्टाने अल्पवयीन मुलीचे लचके तोडून तिला संपवणार्‍या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

विजय खैरनार असं फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी खैरनारने डोंगराळे येथील रहिवासी असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केलं होतं. यानंतर आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे पीडित चिमुकली आरोपीला दादा म्हणायची. मात्र त्याने दादा नावालाच कलंक फासला आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. हे प्रकरण जलद गती कोर्टात चालवून आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त गावकर्‍यांनी केली होती. यानंतर आता अवघ्या दहा महिन्यात कोर्टाने खैरनारला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे. याशिवाय पीडित कुटुंबाला दहा लाखांची मदत देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणात फिर्यादीच्या वकीलांनी सुरुवातीपासूनच आरोपींला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. आरोपीच्या वयाचा विचार न करता त्याने केलेल्या कृत्याचा विचार न्यायालयाने करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. आता त्यानुसारच हा निकाल लागला आहे