डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आले मोठे गुपित, कोड वर्डमध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन!

Foto
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटप्रकरणात तपास यंत्रणांना मोठे धागेदोरे मिळाले आहेत. या स्फोटाच्या आदल्या दिवशीच हरियाण्यातील फरीदाबाद येथून अटक करण्यात आलेला संशयित डॉक्टर मुजम्मिलच्या साहित्यातून काही नवे खुलासे झाले आहेत. त्याच्या खोलीतून मिळालेल्या डायरी आणि वहीतून, हे दहशतवादी मॉड्यूल बराच दिवसांपासून भारतात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत होते, असे स्पष्ट होते.

या डायरीतून मिळालेल्या माहितीवरून, असू दिसून येते की, हे एक आखलेले कटकारस्थान होते. डॉ. मुजम्मिलच्या या डायरीतील नोंदीच्या सहाय्याने दिल्ली स्फोटाशी संबंधित अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
तपास संस्थांना डॉक्टर उमरच्या रूम क्रमांक 4 आणि डॉ. मुजम्मिलच्या रूम क्रमांक 13 या दोन्ही ठिकाणांहून डायऱ्या मिळाल्या आहेत. याशिवाय, फरीदाबादमधील धौज परिसरातील त्या खोलीतूनही एक डायरी जप्त करण्यात आली आहे, जेथून पोलिसांनी तब्बल 360 किलो स्फोटकं जप्त केली होती. हे ठिकाण अलफलाह विद्यापीठापासून केवळ 300 मीटर अंतरावर आहे.

8 ते 12 नोव्हेंबरचा उल्लेख, डायरीत तब्बल 25 नावे

मिळालेली डायरी आणि वहीमध्ये कोड वर्ड्सचा वापर करण्यात आला असून 8 ते 12 नोव्हेंबर या कालावधीचा विशेष उल्लेख आहे. यामुळे या काळात काहीतरी मोठे घडविण्याचा कट रचण्यात आला होता, असा संशय तपास यंत्रणांना आहे. सूत्रांनी दिलेल्याय माहितीनुसार, या डायरीत तब्बल 25 जणांची नावे आढळून आली आहेत. हे सर्व आता पोलिसांच्या तपासा कक्षेत आले आहेत. महत्वाचे म्हणजे, हे सर्व जण जम्मू आणि फरीदाबाद येथील आहेत.