चालकाच्या डुलकीने घात केला, भीषण अपघातात ६ ठार ४ गंभीर

Foto
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील चंबा-नूरपूर नॅशनल हायवेवर सोमवारी पहाटे एक काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. ककीरा जवळील घार भागात एक कार अनियंत्रित होऊन तब्बल ३०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातातगुजरातच्या ६ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चालकाचाही समावेश असल्याचे समजते.

कारमधील हे सर्व पर्यटक गुजरातचे रहिवासी होते. मनाली फिरून झाल्यानंतर ते डलहौसीच्या दिशेने निघाले होते. सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ककीरा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून सहा जणांचा जागीच जीव गेला. ४ पर्यटकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भरपावसात आणि अंधारात रेस्क्यू ऑपरेशन
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अंधार आणि कोसळणारा पाऊस यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. तरीही पोलिसांनी दरीत उतरून सहाही मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. कार मंडी जिल्ह्याच्या पासिंगची असल्याचे समोर आले असून पोलीस आता मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

अपघाताचे नेमके कारण काय?
हा अपघात चालकाला डुलकी लागल्यामुळे झाला की पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने गाडी घसरली, याचा तपास पोलीस करत आहेत. आम्ही गुन्हा दाखल केला असून तांत्रिक बाजूंची तपासणी सुरू आहे. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत,ङ्घङ्घ असे पोलिसांनी सांगितले. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर काळाने अशा प्रकारे झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.