नवी दिल्ली : भारत आणि बेल्जियम यांनी संरक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. भारत आणि बेल्जियमने संरक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्या भारत दौर्यादरम्यान, १५ बेल्जियन संरक्षण कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही भेट दिली. दोन्ही देशांतील कंपन्यांमध्ये जवळपास १० करारांवर स्वाक्षरी झाली. यामध्ये शस्त्रे, ड्रोन, सागरी सुरक्षा, सुरुंग निर्मूलन तंत्रज्ञान, रडार, दारुगोळा आणि इतर संरक्षण प्रणालींचा समावेश आहे.
या सहकार्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे भारत केवळ तयार शस्त्रे खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करत नाहीये. तर दोन्ही देशांतील कंपन्या संयुक्तपणे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि भारतात उत्पादन वाढवण्यासाठी पुढे सरसावत आहेत. याचा फायदा भारताच्या देशांतर्गत संरक्षण उत्पादनालाही होऊ शकतो. त्यामुळे सर्वार्थाने हे करार अतिशय महत्वाचे असल्याचे बोललं जात आहे.
झोरावर रणगाड्यात बेल्जियन ३१०५ टरेट बसवली जाणार
बेल्जियमच्या जॉन कॉकरिल डिफेन्सची ३१०५ टरेट भारताच्या हलक्या वजनाच्या झोरावर रणगाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही टरेट १०५ मिमी तोफेने सुसज्ज असून झोरावरच्या सुरुवातीच्या प्रोटोटाइपमध्ये तिचा वापर आधीच करण्यात आला आहे. हा रणगाडा विशेषतः उंच ठिकाणी आणि कठीण डोंगराळ प्रदेशात काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. झोरावर रणगाडा भारत-चीन सीमेसारख्या उंच प्रदेशात तैनात करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. याचे बुर्ज (टरेट) भारतात तयार करण्याचे कामही सुरू आहे. जॉन कॉकरिल आणि भारतीय कंपनी इलेक्ट्रो न्यूमॅटिक्स अँड हायड्रॉलिक्स यांच्या भागीदारीतून हे बुर्ज तयार करण्याची योजना आहे.
भारतात ७० मिमी रॉकेटचे उत्पादन
बेल्जियमची थेल्स आणि भारताची कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स लिमिटेड यांनी ७० मिमी रॉकेट प्रणालीसाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामध्ये अनगाइडेड (मार्गदर्शक नसलेले) आणि लेझर-गाइडेड (लेझरने नियंत्रित) अशा दोन्ही प्रकारच्या रॉकेटच्या विकासाचा समावेश असेल. महत्त्वाचे म्हणजे, या रॉकेटसाठी उत्पादन क्षमता भारतात स्थापित केली जाईल. थेल्स आपले तांत्रिक ज्ञान (टेक्निकल नो-हाऊ) प्रदान करेल, तर भारतातील कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स उत्पादन, चाचणी आणि प्रणाली एकत्रीकरण (सिस्टीम इंटिग्रेशन) हाताळेल. भारतातील पहिले पूर्णपणे तयार रॉकेट २०२७ च्या सुरुवातीपर्यंत उत्पादित करण्याचे लक्ष्य आहे. हे ७० मिमी रॉकेट भारतीय सशस्त्र दलांद्वारे वापरल्या जाणार्या प्लॅटफॉर्मसाठी वापरले जाऊ शकतात. थेल्सच्या मते, त्यांचे तंत्रज्ञान हवाई, भू आणि सागरी मोहिमांमध्ये वापरले जाऊ शकते.
सुरुंग शोधण्यासाठी रोबोटिक प्रणाली
भारत-बेल्जियम सहकार्याचा एक महत्त्वाचा भाग सागरी सुरुंगांशी संबंधित आहे. लार्सन अँड टुब्रो आणि एक्सेल रोबोटिक्स यांच्यातील करारानुसार, पाण्याखालील सुरुंग शोधणे, ओळखणे आणि काढून टाकण्यास मदत करणारे तंत्रज्ञान विकसित केले जाईल. हे तंत्रज्ञान भारतीय नौदलासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण सागरी सुरक्षा आणि जहाजांच्या सुरक्षित हालचालींसाठी सुरुंग शोधणे आणि काढून टाकणे आवश्यक आहे. सुरुंग विरोधी उपाययोजना क्षमता वाढवणे ही भारतीय नौदलाची गरज असल्याचे पूर्वीपासूनच ओळखले जाते.
वार्षिक १० कोटी राऊंड्स उत्पादन करण्याची योजना
बेल्जियमची लाशेज कंपनी आणि भारताची टेंबो क्लासिक इंजिनिअरिंग यांच्यात दारुगोळा निर्मितीसाठी एक मोठा करारही झाला आहे. यामध्ये भारतात उत्पादन लाइन स्थापन करण्याची योजना समाविष्ट आहे. प्रस्तावित प्लांटमध्ये वार्षिक अंदाजे १० कोटी राऊंड्स उत्पादन करण्याची क्षमता असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे ५ कोटी युरो खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प दोन प्रकारच्या दारुगोळ्यासाठी संपूर्ण उत्पादन लाइन आणि इतर दोन कॅलिबरसाठी आवश्यक यंत्रसामग्री व अवजारे उपलब्ध करून देईल. याची स्थापना आणि वितरण २०२८ ते २०२९ दरम्यान करण्याचे नियोजन आहे.
ड्रोन आणि काउंटर-ड्रोन तंत्रज्ञानावरील सहकार्य
भारत आणि बेल्जियम यांच्यातील सहकार्य केवळ रणगाडे, रॉकेट्स आणि दारुगोळ्यापुरते मर्यादित नाही. दोन्ही देशांतील कंपन्यांमध्ये ड्रोन, काउंटर-ड्रोन प्रणाली, इलेक्ट्रो-ऑप्टिकल उपकरणे आणि इतर प्रगत संरक्षण प्रणालींवरही करार झाले आहेत. या तंत्रज्ञानातील परदेशी कंपन्यांच्या कौशल्याला आपल्या स्वतःच्या उत्पादन क्षमतेसोबत जोडण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.