पैठण, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने अमली पदार्थ विरोधी अभियान राबवण्यात येत आहे.
याच अभियानाचा एक भाग म्हणून पोलीस ठाणे पैठण आणि अमली पदार्थ विरोधी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीला अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यांचे मानवी जीवनावर होणारे घातक परिणाम आणि नशामुक्त जीवनाचे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अंमली पदार्थांना ठामपणे नकार हा संदेश देण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान महाविद्यालयाच्या आवारात आणि परिसरात जनजागृतीचे फलक लावण्यात आले.
पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे समाजाला व्यसनमुक्त समाज, सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एपीआय पवार, पीएसआय खंडागळे, हेड कॉन्स्टेबल घुले, अनिल गायकवाड, घुले, भालेराव तसेच प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य सोनकांबळे तसेच कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.