दारुड्या कारचालकाने रिक्षासह दुचाकीला उडविले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (छत्रपती संभाजीनगर) : जिन्सी परिसरातील बारी कॉलनीतील  दारुड्या कार चालकाने रिक्षा आणि दुचाकींना दुचाकींना उडवत एका घराच्या लोखंडी गेटला जोरात धडक दिली. ही घटना रविवारी (दि.1) रात्री 8:10 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
अफजल इक्बाल मर्चड (40, रा. नाजिया मशीद परिसर) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे. 1 फेब्रुवारी रोजी रात्री 8:10 वाजेच्या सुमारास बारी कॉलनी गल्ली नंबर 5 मध्ये अपघात झाल्याचा कॉल डायल 112 ला मिळाला होता. घटनास्थळी जिन्सी ठाण्याचे हवालदार लोभाजी सुक्रे आणि चालक विलास बकले यांनी धाव घेतली. आरोपी अफजल मर्चड क्रेटा कार (एमएच-20-एफजी-4881) भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत होता. नशेत असलेल्या अफजलने सुरुवातीला गल्लीत उभ्या असलेल्या एका रिक्षाला आणि दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कार थेट एका घराच्या लोखंडी गेटवर जाऊन आदळली. त्यामुळे गेटच्या आतील दुचाकीही ठोकरल्या गेल्या. पोलिसांनी आरोपीला गाडीतून खाली उतरवले असता त्याच्या तोंडाचा उग्र वास येत होता. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. तपासणीअंती त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी हवालदार लोभाजी सुक्रे यांच्या तक्रारीवरून अफजल मर्चडविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.