औरंगाबाद: शहरातील रस्त्याच्या कामासाठी मिळालेल्या विशेष निधीतून शहरातील विविध भागातील रस्त्याची कामे सध्या जोरात सुरू आहेत. मात्र, कामे होत असताना ती योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
चिश्तिया चौक ते बळीराम पाटील शाळा या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, पूर्वीच्या रस्त्याचे कुठलेही खोलीकरण न करता त्याच रस्त्यावर सिमेंट काँक्रीटच्या रस्ता बनवण्यात येत आहे. यामुळे रस्ताची उंची जवळपास दोन दीड ते दोन फुट वाढली असून मध्यभागी असलेल्या दुभाजकापेक्षाही रस्त्याची उंची अधिक झाली आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला असणारया दुकानांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील दुकानदारांमध्ये देखील नाराजी पहायला मिळत आहे. कुठलेही खोलीकरण न करता केवळ वरवरचे काम केले जात असुन यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
''पूर्वीचा डांबरी रस्ता उकरून व्यवस्थित खोलीकरण करून रस्त्याचे काम व्हायला हवे होते. मात्र, कुठलेही खोलीकरण न नुसतेच वरवर काम करण्यात आले आहे. रस्त्याची उंची वाढल्याने पावसाळ्यात आमच्या दुकानात पाणी शिरणार आहे. याचा मोठा त्रास आम्हाला सहन करावं लागणार आहे. याचा मोठ्या स्तरावर विरोध व्हायला हवा होता.''
उद्धव चोरमारे
वृंदावन सोडा सेंटरचे मालक