छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) ; मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. विभागातील ६१ गावे आणि ४६ वाड्यांना १२६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
पावसाचा खंड वाढल्यास टँकरच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. यंदा मराठवाड्यात मान्सून वेळेत दाखल झालाच नाही. त्यामुळे जून आणि जुलैअखेरपर्यंत टँकरच्या संख्येत चारशेवर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता.
जुलै महिन्यातील शेवटचे चार पाच दिवस आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात चागला पाऊस झाला. परंतु त्यानंतर गायब झालेला पाऊस सप्टेंबर महिना उजाडला तरी दाखल झालेला नाही. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेल्याने ग्रामीण भागात टंचाईच्या झळा तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांत ९२ गावे, ३६ वाड्यांना १५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जून - जुलै महिन्यात यात वाढ झाल्याने एकही जिल्हा टँकरमुक्त न झाल्याने विभागातील २४४ गावांसह ९६ वाड्यांना २१ शासकीय, ३९२ खासगी अशा एकूण ४१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही टँकर संख्या कमी होऊन चक्क ९६ वर आली होती. पावसाचा खंडा वाढत असल्याने टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत.
--- जिल्ह्यातील टँकरची परिस्थिती ---
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ गावे, ४ वाड्यांना २७टँकरने पाणी पुरवठा केल जात आहे. तर जालन्यातील १२ गावे, ९ वाड्यांना २२ टँकरने, बीड मधील २६ गावे, ३३ वाड्यांना तब्बल ६८ टॅकरन तर धाराशिव जिल्ह्यातील ७ गावांना ९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आहे. विभागातील ६१ गावे आणि ४६ वाड्यांना १२६ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी ४३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.













