बहिण-भावाच्या भांडणात लेक बॅट घेऊन बापावर धावली, संतापलेल्या बापाने त्याच बॅटने लेकीला संपवले...! आईने प्रकरण लपवण्याचा केला होता प्रयत्न...

Foto
सातारा : टीव्ही पाहण्यावरून बहिण आणि लहान भावाचा वाद झाल्यानंतर वडिलांच्या अंगावर धावून आलेल्या पोटच्या लेकीला डोक्यात बॅट घालून संपवल्याची भयावह घटना सातार्‍यात घडली. आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७ वर्षे, रा. गोडोली, सातारा)  असे या मुलीचे नाव आहे. आरोपी वडील पुरुषोत्तम संपत कदम असून ते व्यवसायाने शिक्षक आहेत. सातार्‍यातील गोडोलीत  शनिवारी (३ ऑक्टोब) रात्री ही घटना घडली आणि रविवारी सायंकाळी उघडकीस आली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुरुषोत्तम कदम हे गोडोली परिसरात पत्नी शीला (शिक्षिका), दोन मुली आणि एका लहान मुलासमवेत राहतात. आर्याच्या सतत टीव्ही बघणे, मोबाईल पाहत बसणे, उद्धट बोलणे आणि कुटुंबियांवर आक्रमक होणे या वर्तणुकीमुळे वडील त्रस्त होते. या वर्तणुकीमुळे तिच्यावर पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारही सुरू होते.  

...आणि आर्या घरातच निपचित पडली 
शनिवारी रात्री लहान भाऊ, बहीण आणि आर्या यांच्यामध्ये टीव्ही पाहण्यावरून वाद झाला. या वादात आर्याने लहान बहिणीच्या डोळ्यावर ठोसा मारल्याने बहिणीचा डोळा सुजला. हे पाहून वडिलांनी तिला रागवून शांत राहण्यास सांगितले. यानंतर आर्या अचानक आक्रमक होऊन वडिलांना आरेतुरे करत त्यांच्या अंगावर बॅट घेऊन धावली. हा राग सहन न झाल्याने वडिलांनी तीच बॅट आर्याच्या डोक्यात मारली. बॅटचा वर्मी घाव बसल्यामुळे आर्या घरातच निपचित पडली व तिचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी वडिलांनी पोलिसांना माहिती देताना मुलीने स्वतःच डोके आपटून घेतले असा भासकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आर्याच्या आईकडे कसून चौकशी केली असता, पतीने रागाच्या भरात डोक्यात बॅट मारून मुलीचा खून केल्याची कबुली दिली. सातारा पोलिसांनी वडील पुरुषोत्तम कदम यांना अटक केली आहे.