गुलमंडी, उस्मानपुऱ्यात महिलांसाठी ई-टॉयलेट सभापती अनिल मकरिये यांचा पुढाकार

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महिलांसाठी स्वच्छता सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या पुढाकारातून गुलमंडी आणि उस्मानपुरा या दोन ठिकाणी ई-टॉयलेट सुरू करण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१७) मनपात बैठक झाली. महिलांच्या सोयीसाठी प्राधान्याने शहरात दोन ई-टॉयलेट उभारणीचा पायलट प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सभापती मकरिये, गलिच्छ वस्ती सुधार
समिती सभापती जालिंदर शेंडगे, शहर अभियंता संजय कोंबडे, शंकर म्हात्रे, किशोर मानकापे, सागर नीलकंठ आदींची उपस्थिती होती. यासंदर्भात सभापती मकरिये यांनी सांगितले की, गुलमंडी चौक आणि उस्मानपुरा या दोन प्रमुख ठिकाणी ई-टॉयलेट सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ई-टॉयलेटसारख्या आधुनिक सुविधांमुळे महिलांच्या दैनंदिन गरजा सुलभ होतील. हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर शहरभर अशा सुविधा वाढविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions