औरंगाबाद: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गेल्या दोन-तीन दिवसांपासून आजारी असल्याने इस्पितळात भरती झाले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत दानवे यांच्या आजाराने कार्यकर्त्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. सध्यातरी प्रचाराची धुरा गृहमंत्री निर्मलाताई दानवे आणि मुलगा आमदार संतोष दानवे तेच सांभाळताना दिसतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली. मतदानाची तारीख अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघात दानवेंना काँग्रेस आघाडीच्या विलास औताडे यांनी आव्हान दिले आहे. गेल्यावेळी मोदी लाटेतही औताडे यांनी चांगली टक्कर दिली होती. त्यामुळे यावेळीही अटीतटीची लढाई होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. निवडणूक प्रचार शिगेला असताना प्रदेशाध्यक्ष दानवे आजारी पडले. गेल्या दोन-तीन दिवसापासून ते औरंगाबादच्या एका इस्पितळात भरती झाले आहेत. दादांच्या आजाराने कार्यकर्त्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. प्रचंड विस्तारलेल्या जालना मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडत असताना आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह राज्यमंत्री अर्जुन खोतकर प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे, मुलगा आमदार संतोष दानवे, मुलगी जि. प. आशा पांडे यांनीही प्रचाराची धुरा सांभाळली आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे नेटवर्क जबरदस्त आहे. दानवे इस्पितळात असल्याने येथे कार्यकर्त्यांची रीघ लागलेली दिसते. प्रचाराचे नियोजन आणी इतर बाबींचे नियोजन इस्पितळातून होत आहे. दानवे यांची खास माणसे दररोज पल पल की खबर त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला तरी दानवे यांची चर्चा सतत सुरू असते.