खा. खैरेंनी कुटुंबीयांसह घेतले राजूर गणपतीचे दर्शन !

Foto
औरंगाबाद  : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडून सुमारे महिना लोटला आहे. उद्या गुरुवारी  लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान शिवसेनेचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून कुटुंबीय व पदाधिकार्‍यांसह राजूर येथील गणपतीचे दर्शन घेतले.त्यांनी गणपतीचे दर्शन घेतल्यामुळे निवडणूक निकालाच्या अनुषंगाने त्यांनी गणरायाला पाठीशी उभा राहण्यासाठी साकडे घातल्याची  चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली.

देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल उद्या बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे. सर्वच पक्षांच्या दृष्टीने मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण व अतिशय चुरशीची लढत झालेल्या औरंगाबाद लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. गेली चार टर्म खैरे हे येथील खासदार आहेत.  या निवडणुका दरम्यान युती असतानाही काही भाजप पदाधिकार्‍यांनी खैरे यांचे काम केले नसल्याचे बोलले जात आहे. पुन्हा त्यात भर म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी  निवडणूक लढविली. त्यांना बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे ही  चर्चा राजकीय वर्तुळात  असल्याने  येथील निकालाबाबत सर्वत्र उत्सुकता लागलेली आहे. खैरे हे नेहमीच राजूर येथे गणपती दर्शनाकरिता जात असतात .परंतु यंदाच्या निवडणुकीत त्यांची झालेली कोंडी उद्या लागणारा निकाल,त्यातच खैरे यांनी संकष्ट चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र राजुर येथील गणरायाचे घेतलेले दर्शन यामुळे त्यांनी राजुरेश्वराला साकडे घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत महापौर नंदकुमार घोडेले, वैजयंती खैरे, नगरसेवक सचिन खैरे, युवासेना जिल्हायुवाधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे, सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवर, उपजिल्हा संघटक नलिनी बाहेती, रतन घोंगते, मच्छिंद्र सोनवणे आदींची उपस्थिती होती.