खा, प्या आणि मजा करा, भारताची संस्कृती नाही...; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उधळपट्टी टाळून बचत वाढवण्याचा सल्ला!

Foto
नवी दिल्ली : सुमारे ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या आणि माओवादी धोका संपुष्टात आणण्याच्या यशाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना आणि सचिवांना, पुढील लक्ष अंमली पदार्थांचे व्यसन संपवण्याचे ठेवण्याचे आवाहन केले आहे. या चर्चेशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी सर्व मंत्रिमंडळ सदस्यांना आणि सरकारी सचिवांना बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देण्यास सांगितले. तसेच, खा, प्या आणि मजा करा, या तत्वावर भारतीय संस्कृती विश्वास ठेवत नाही, असेही म्हटले आहे.

असे का म्हणाले पंतप्रधान मोदी?
खरे तर, दारिद्य्र रेषेच्या बाहेर पडलेले अनेक लोक अनावश्यक आणि बेहिशेबी खर्च करण्याच्या सवयीमुळे पुन्हा एकदा गरिबीत जाऊ शकतात, अशी चिंता पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. दरम्यान, २०११ ते २०२३ दरम्यान जगात सर्वाधिक वेगाने गरिबी कमी करणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश होणे ही एक राष्ट्रीय उत्सवाची बाब आहे. सरकार, अधिकारी, उद्योग आणि सामान्य जनतेच्या सामूहिक योगदानामुळेच हे शक्य झाल्याचे मोदी यांनी यावेळी म्हणटे आहे.

तरुणाईला वाचवण्यासाठी नशामुक्ती संकल्प आवश्यक 
भारताने डाव्या विचारसरणीचा उग्रवाद संपवण्याचे लक्ष्य साध्य केले असल्याचे सांगत मोदी म्हणाले, जर सामूहिक प्रयत्नांतून आपण कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढू शकतो आणि उग्रवाद संपवू शकतो, तर आपण अंमली पदार्थांचा गैरवापरही नक्कीच संपवू शकतो. भावी पिढीला वाचवण्यासाठी नशेच्या पदार्थांचे सेवन संपुष्टात आणणे अत्यंत आवश्यक आहे. तो एक वैयक्तिक संकल्प बनायला हवा. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि समाजाचाही संपूर्ण सहभाग आवश्यक असल्याचेही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.