वैजापूर, (प्रतिनिधी) : मुंबई नागपूर महामार्गावरील पुरणगाव रस्त्यावर स्टीलची वाहतूक करणारा आयशर ट्रक व दुधाची वाहतूक करणारा छोटा हत्ती यांच्या समोरासमोर धडक झाली. या धडकेत एका जणाचा मृत्यू झाला. तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना २९ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता घडली. शुभम दिलीप शेटे (वय २५, रा. शेटे वस्ती, वैजापूर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
बेलगाव येथून दूध घेऊन वैजापूरकडे खुशा दत्ता निमसे व शुभम शेटे हे आपल्या छोट्या हत्ती वाहनाने वैजापूरकडे येत होते. त्याच वेळेस स्टील भरून शिर्डीकडे जाणारा आयशर ट्रक (एमएच : ४२ २८४२) व छोटा हत्तीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, छोटा हत्ती जागेवरच पलटी झाला. आयशर ट्रक रस्त्याच्या खाली गेला. या अपघातामध्ये शुभम शेटे (वय २५) यास गंभीर दुखापत झाली.
खुशा दत्ता निमसे (वय २०) हा किरकोळ जखम झाला. नागरिकांनी शुभम शेटे व खुशाल निमसे यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने शुभम शेटे यास छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शुभम शेटेचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची वैजापूर पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत.