मनपा स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड; सचिन खैरे, जंजाळ, राजू शिंदे, कमलाकर जगताप, सुरेखा सानप आदींचा समावेश

Foto
औरंगाबाद: महापालिकेतील महत्त्वाची व ‘अर्थ’ पूर्ण अशी समिती मानल्या जाणार्‍या स्थायी समितीतील आठ सदस्य एप्रिलअखेरीस निवृत्त होत असल्याने रिक्‍त होणार्‍या जागांवर आज शुक्रवारी सर्वसाधारण सभेत नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली. यात शिवसेनेच्या 5, एमआयएमच्या 2 व भाजपच्या एका सदस्याचा समावेश आहे. 

 स्थायी समितीच्या एकूण 16 सदस्यांपैकी 8 सदस्य या महिनाअखेर निवृत्त होणार असल्याने त्यांच्या रिक्‍त जागांवर आपली वर्णी लागावी, यासाठी इच्छुक नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली होती. शिवसेनेच्या कोट्यातून स्थायी समितीमध्ये जाणार्‍या इच्छुकांची संख्या तर लक्षणीय होती. आज शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी नवीन आठ सदस्यांची घोषणा केली. त्या-त्या पक्षांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेऊन ज्या गटाचे किंवा ज्या पक्षाचे जेवढे सदस्य निवृत्त होत आहेत, त्यानुसार शिवसेनेच्या 5, एमआयएमच्या 2 व भाजपच्या एका सदस्याची निवड करण्यात आली.

नव्याने निवड झालेले सदस्य
सचिन खैरे, कमलाकर जगताप, सीमा चक्रनारायण, राजेंद्र जंजाळ, सुरेखा सानप (सर्व शिवसेना), राजू शिंदे (भाजप), नासिर सिद्दीकी, सय्यदा बेगम कुरेशी (एमआयएम) आदींची वर्णी लागली आहे.