कन्नड तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत जाहीर
कन्नड, (प्रतिनिधी) : येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रीया पार पडली असून तालुक्यातील १८ ग्रामपंचायती मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत तर डोंगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षीत निघाले आहे.
ही सोडत नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी लता बागुल तसेच तहसीलदार सारिका भगत यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मुसद्दीक शेख मुजफ्फर रा. कन्नड या विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित नागरिक व लोकप्रतिनिधीं समक्ष ईश्वर चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्यात आली. यामध्ये १८ ग्रामपंचायती मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या. उर्वरित एक चिठ्ठी डोंगरगाव या गावाची निघाल्याने ती ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली.
यापूर्वी ७ जुलै २०२५ रोजी मागास प्रवर्गासाठी निश्चित ग्रामपंचायती पळशी खु., जळगाव घाट, सारोळा, तेलवाडी, नावही, नाचणवेल, आहगाव (जे), विटखेहा, वासही, सोनवाही, घुसूर, देभेगाव, करंजखेहा जा., वहोद, जैतखेहा, पिशोर, कळंकी, पळसखेहा. झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीनुसार ३९ ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होत्या.
डोंगरगावचा समावेश झाल्याने आता तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाल्या आहेत. सोडत प्रक्रियेदरम्यान नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे, नायब तहसीलदार प्रशांत काळे, भगवान सिसोदे, शिक्षक जगदीश चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून इच्छुकांचे लक्ष या सोडतीकडे लागले होते. आता सोडत जाहीर झाल्याने इच्छुक व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.















