मुंबई : कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आणि आदित्य ठाकरेंसोबत सावलीसारखे वावरणारे सचिन अहिर यांनी आज शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. आज सकाळपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी कुणाला संधी मिळणार याची चर्चा होती. मात्र, आज अचानक शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केल्याची दृश्य समोर आली.
विधानपरिषेतील उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह सचिन अहिर यांनी आपली भूमिका जाहीर केली. मात्र या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे सुरूवातीला चुकून सचिन अहिरांना आमदार सचिन तेंडुलकर म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या या उच्चारानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. एकनाथ शिंदेंसोबत सचिन अहिरांसह पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले. सचिन अहिर यांनी आज षटकार मारला. गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी षटकार मारला होता. अजूनही चौकार षटकार सुरूच आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मगाशी मी चुकून सचिन तेंडुलकर असं नाव घेतलं. परंतु सचिन अहिर देखील उत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. आज त्यांनी गुगली देखील टाकली, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं?, अहिरांच्या भावाला बीएमसी दिली, मुलीला प्रभाग समिती दिली, त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं. रोज भेटत होतो, आता काय अहिरांसारख्यांची रोज काय आरती करायची?, जवळचे आणि ज्यांना सगळं काही मिळतं तेच निघून जातात. कुणाच्या जाण्याने धक्का बसत नाही. वरळी, शिवडी हा आमचा बालेकिल्ला आहे.आमचं तिकडचं काम बोलेल. तुम्हाला अजून काय हवंय, आणखी काय ओरबाडाणार?, सगळ्या परिवाराला काही ना काही दिलंय, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. तसेच वरळीतून ते (सचिन अहिर) उमेदवार असतील तर काही फरक पडणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. सचिन अहिरांना हाच प्रश्न आहे की, जे सोडून गेले, जे मंदिरं लुटतायत त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता? आम्हाला खोलवर अभ्यास केल्यावर हे लक्षात आलंय की, हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.