मुंबई : राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला मोठे यश मिळाले. ठाकरेंची शिवसेना दोन नंबरचा पक्ष ठरला. आता महापौरपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी शिवसेनेतून होत आहे. दरम्यान, आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मदत करण्याचे आवाहन केले. या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.
"एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर करावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्यावर्षी त्यांना हीच खरी श्रद्धांजली असेल. एकनाथ शिंदे यांना मी आवाहन करतो की, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देऊन शिवसेनेचा महापौर मुंबईत बसवण्यासाठी मदत करावी, असेही भास्कर जाधव म्हणाले. जाधव यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळा उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महापौरपदाबाबत मोठे विधान केले होते. "देवाची इच्छा असेल तर आपला महापौर बसेल", असे विधान ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, महापौरपदाबाबत राजकीय वर्तुळात हालचाली सुरु असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण , आता महायुतीचाच महापौर होणार असल्याची माहिती महायुतीमधील नेत्यांनी दिली.
"शिवसेना प्रमुखांना श्रद्धांजली वाहणे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणे हा आजचा दिवस आहे. आज बाळासाहेबांच्या आठवणी जागवण्याचा दिवस आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी काय राजकीय पोस्ट केली. त्यावर भाष्य करण्याचा दिवस आज मी समजत नाही. आज फक्त बाळासाहेबांच्या आठवणी जपणे हेच उचित ठरेल, असेही जाधव म्हणाले.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून पाठिंबा दिला पाहिजे
यंदाचे वर्ष हे बाळासाहेब यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे आणि त्याच वर्षी शिवसेनेचा महापौर हा मुंबई महापालिकेवर असणार नाही. याच्यासारखे दु:ख नाही, म्हणून आम्ही बाळासाहेब यांचे विचार पुढे घेऊन जात आहे असे सांगतात त्या सर्वांना मी विनंती करतो की हे बाळासाहेब यांच्या जन्मशताब्दीचे वर्षे आहे. बाळासाहेबांसमोर तुम्ही नतमस्तक होऊ शकता का? असाल तर तुम्ही भाजपाला सांगितले पाहिजे की हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दीचे वर्षे आहे यासाठी आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही उद्धव ठाकरे सांगतील त्या उमेदवाराला महापौरपदासाठी पाठिंबा दिला पाहिजे, असंही भास्कर जाधव म्हणाले.