मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. त्यात मुंबईत ८९ जागा जिंकत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपा शिंदेसेना महायुतीने मुंबईत ११८ जागा मिळवल्या आहेत. बहुमतापेक्षा फक्त ४ जागा महायुतीकडे जास्त आहेत. त्यात शिंदेसेनेच्या २९ जागांशिवाय भाजपाला बहुमत मिळवणे कठीण जाणार आहे. ही राजकीय परिस्थिती पाहता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौरपदाची मागणी होऊ लागली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचं जनशताब्दी वर्ष आहे त्यामुळे महापौर शिवसेनेचा असावा अशी मागणी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेसाठी मुंबई हा भावनिक विषय आहे. गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेचा महापौर मुंबईवर आहे. मात्र आता शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच भाजपाचा महापौर मुंबईत विराजमान होणार आहे. त्यात महापालिका निकालातील आकड्यांच्या गणितात भाजपाला ८९ जागा मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी त्यांना एकनाथ शिंदेंची गरज भासणार आहे. त्यामुळेच अडीच अडीच वर्ष महापौरपद असावं अशी मागणी आता पुढे आली आहे.
त्यातच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नवनियुक्त नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपासोबत वाटाघाटीत कायम एकनाथ शिंदे वरचढ होताना दिसले आहेत. मुंबईच्या जागावाटपातही सुरुवातीला शिवसेनेला ४०-५० जागा सोडण्याची तयारी भाजपाची होती. मात्र शिंदेंच्या भूमिकेमुळे अखेरीस महायुतीत ९० जागा शिंदेसेनेच्या वाट्याला आल्या होत्या. मात्र आता निकालानंतर सत्तेचे गणित जुळवताना शिवसेनेचं नेमकं काय स्थान असावे यासाठी भाजपा नेत्यांसोबत वाटाघाटी होणार आहेत. मात्र त्याआधी शिंदेंनी त्यांच्या सर्व नगरसेवकांना ताज लँडस या हॉटेलमध्ये बोलावले आहे. या नगरसेवकांची आज बैठक होईल, त्यात एकनाथ शिंदे त्यांना मार्गदर्शन करतील. मात्र इतकेच नाही तर या सर्व नगरसेवकांना तयारीनिशी हॉटेलला यायचे आदेश आहेत. पुढचे ३ दिवस हे नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी असतील.
दरम्यान, महायुतीत लढत असताना मागण्या होत असतात. परंतु महापौरपदाबाबत जो निर्णय घ्यायचा तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील. आमच्याकडे सत्तेत कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री हे न पाहता विकासासाठी आम्ही काम करतो. मुंबईतील सत्ता स्थापनेसाठी एकत्रित बसून चर्चा होईल. परंतु योग्य तो समन्वय साधून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निर्णय होईल. मागणी करायला काही हरकत नाही वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असतात. आमचे नेतृत्व समंजस आहे ते योग्य निर्णय घेतील. मागणी होऊ शकते परंतु एकनाथ शिंदे दबावतंत्र वापरतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.